देवा भाऊंच्या नागपूरमध्ये आता ट्रॅफिक गोंधळावर पोलिसांचा ‘यू-टर्न’ चालू झालाय. रस्त्यावरचा मृत्यू थांबवून शिस्तीचा संदेश देणारी ही मोहीम अपघातांची संख्याच झपाट्याने कमी करत आहे.
देवा भाऊंच्या शहरात आता ट्राफिक गोंधळाच्या इतिहासावर ‘यू-टर्न’ घेतला जातोय. पोलिसांच्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ या अफाट मोहिमेने अवघ्या 21 दिवसांत रस्ते अपघातातील मृत्यूंचा आकडा थेट 62.5 टक्क्यांनी घटवून दाखवला आहे, तर गंभीर जखमींच्या संख्येत तब्बल 84.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. हे आकडे म्हणजे रस्त्यावर रक्ताने रंगलेली कहाणी आता नव्या जबाबदारीने पुन्हा लिहिली जात असल्याचा स्पष्ट पुरावा आहे.
10 जुलै 2025 रोजी सुरू झालेलं ऑपरेशन यू-टर्न हे नागपूर पोलिस आयुक्त रविंदर सिंगल आणि सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची कल्पनाशक्ती आणि निर्णयक्षमता यांचं मूर्तरूप आहे. आयपीएस लोहित मतानी यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन यू टर्न धडाडीने सुरू आहे. दारू पिऊन वाहन चालवणं, चुकीच्या बाजूने चालवणं, हेल्मेट न वापरणं आणि सततच्या ट्राफिक उल्लंघनावर लगाम घालण्यासाठी ही मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली.
कठोर पेट्रोलिंग
नागपूर पोलिसांनी केवळ दंड वसूल करण्यापुरती ही मोहीम मर्यादित ठेवली नाही, तर जनजागृती, सखोल निरीक्षण, सायंकाळनंतरही टेहळणी, उच्च-जोखीम असलेल्या भागांमध्ये कॅमेरे व पेट्रोलिंगच्या माध्यमातून कारवाई अशी संयोजनबद्ध रणनीती आखली. ही केवळ शिक्षा देण्याची मोहीम नाही, ही जीव वाचवण्याची लढाई आहे, असं वाहतूक शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
वाहतूक शाखेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै २०२४ मध्ये ४० मृत्यू झाले होते, तर जुलै २०२५ मध्ये फक्त १५ मृत्यू नोंदवले गेले. म्हणजे 62.5 टक्के घट. त्याचप्रमाणे, गंभीर जखमींची संख्या १३ वरून २ वर आली, म्हणजे 84.5 टक्के घट. हे आकडे केवळ यशाचं प्रतिबिंब नसून, नागपूर शहरातील वाहनचालकांच्या मानसिकतेत झालेला सांस्कृतिक बदल दर्शवतात.
Parinay Fuke : आता प्रत्येकाच्या तोंडी असेल दिव्याची यशोगाथा
वाहनचालकांमध्ये समजूतदारपणा
रस्त्यावर पोलीस दिसले की वेग आटोक्यात येतो या मानसिकतेपेक्षा रस्ता म्हणजे जबाबदारी ही भावना नागपूरकरांमध्ये पेरली जात आहे. चोख बंदोबस्त, उशिरा रात्रीचे नाकाबंदी तपास, सीसीटीव्ही वॉच आणि सतत लक्ष ठेवणारी यंत्रणा यामुळे वाहनचालकांमध्ये आता नियमांप्रती भीती नसून, समजूतदारपणा वाढतोय. पोलीस आयुक्त रविंदर सिंगल यांचं म्हणणं आहे, आम्ही कारवाई करतच राहू, पण उद्देश केवळ दंड नाही, तर प्रत्येकाचा जीव वाचवणं हाच आहे. नागपूरमध्ये एक जबाबदार वाहन संस्कृती निर्माण करणं हे आमचं ध्येय आहे.
‘ऑपरेशन यू-टर्न’ ही केवळ पोलिसांची मोहीम नाही, तर नागपूरच्या रस्त्यांवर सुरु झालेली नवीन वाटचाल आहे. जी अपघातांकडून सुरक्षिततेकडे नेणारी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या गावात हे यश केवळ प्रशासनाचं नाही, तर नियम पाळणाऱ्या प्रत्येक नागपूरकराचं आहे. आता हे उदाहरण महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे, कारण प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक सिग्नलवर एक जीव उभा असतो, जो कोणाच्यातरी आयुष्याचा केंद्रबिंदू असतो.
Yashomati Thakur : मतचोरीच्या मुद्द्यावर ठोस पुरावे लवकरच आणणार समोर