उपराजधानी नागपुरात गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे महापुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र यंदा अशी परिस्थिती टाळण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे पुढे सरसावले आहेत.
राज्यात मान्सूनची चाहूल लागली आहे. अवकाळी पावसाने आधीच काही भागांना झोडपले आहे. अशातच उपराजधानी नागपूरच्या अंगणात पावसाळा उभा ठाकला आहे. मागील दोन वर्षांत महापुराचा थरार अनुभवलेल्या नागपूरकरांसाठी यंदा धोका टाळण्याचे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातत्याने जलभराव, वाहतूक खोळंबा आणि घराघरात घुसणारे पाणी या संकटांचा इतिहास लक्षात घेत, यंदा तोंडावर येऊन ठाकलेल्या संकटाला रोखण्यासाठी प्रशासन एक पाऊल पुढे टाकत आहे.
सोमवारी नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यात विविध झोनचे अधिकारी, आमदार, पदाधिकारी आणि माजी मंत्री एकत्र आले होते. या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी नालेसफाई, गटार दुरुस्ती आणि रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेतला. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेशही देण्यात आले आहे. 2023 वर्षात शहरातील खालच्या भागात पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. ही पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्या, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Wardha : सत्ता सोडून प्रशासनाच्या खुर्चीत बसले किरीट सोमय्या
रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक
रस्त्यांवरील खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे दरवर्षी नागपूरकरांची ससेहोलपट होते. यंदा ही कथा पुन्हा लिहिली जाणार नाही, यासाठी मनपा सज्ज आहे, असं चित्र या बैठकीतून उमटलं. मुख्य अभियंता तळेवार आणि आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कामांची सद्यस्थिती सविस्तर मांडली. महानगरपालिकेत गेले तीन वर्षे प्रशासक राज सुरू असल्यामुळे, नागपूरमध्ये निवडून आलेले नगरसेवक नाहीत. त्यामुळे नागरिकांना लहानसहान कामांसाठी मनपाच्या दारात सातत्याने चकरा माराव्या लागतात. कामे लांबणीवर पडत असल्याने, लोकांमध्ये संताप वाढतोय.
अशी बाब लक्षात घेता पालकमंत्र्यांनी आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या झोननिहाय दौरे करा, लोकांशी संवाद साधा आणि त्यांच्या अडचणी तात्काळ सोडवा. बावनकुळे यांच्या नेतृत्वात आता पावसाळा पूर्वतयारी गतीने सुरू झाली असली, तरी खरा कस लागेल ते मान्सून धडकताना. प्रशासनाच्या सज्जतेपेक्षा पावसाचा आवेग अधिक असेल, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती कायम आहे. मात्र यंदा ‘नाही म्हणता येणार नाही’ अशा स्वरूपाचं कोणतंही संकट येऊ नये, यासाठी नागपूर नक्कीच सज्ज होत आहे.
Amol Mitkari : खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांची स्पर्धा सुरू
