नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर एका महिला पोलिसाच्या विनयभंगाचा दावा करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.
नागपुरातील हिंसाचाराने महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. औरंगजेबच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादानंतर शहरात उसळलेल्या दंगलीमुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या गोंधळात एक धक्कादायक आरोप समोर आला होता. एका महिला पोलिसाच्या विनयभंगाचा. पोलिसांनीच हा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले होते, मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा साफ खोडून काढला आहे.
नागपुरातील या दंगलीदरम्यान दंगलखोरांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली, जाळपोळ घडवून आणली, आणि पोलिसांवर हल्ले केले. यात अनेक पोलीस जखमी झाले. याच दरम्यान, एका महिला पोलिसाला शिवीगाळ करण्यात आली आणि तिच्या वर्दीला हात लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली.
Bacchu Kadu : स्वराज्याच्या किल्ल्यातून राजधानीपर्यंत आवाज पोहोचणार का
राजकारणात खळबळ
पोलिसांवरच हल्ले होत असतील, तर सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित असतील? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकार काय करत आहे? पोलिसांच्या सुरक्षेची हमी कोणी देणार? अशा प्रश्नांनी राजकीय वातावरण तापले होते.
पोलिसांनी याबाबत तक्रार देखील केली होती. मात्र, आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा संपूर्ण दावा खोडून काढत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या महिला पोलिसाचा विनयभंग झालाच नाही. होय, तिच्यावर दगडफेक झाली, मात्र विनयभंगाचा आरोप चुकीचा आहे. हा खुलासा पोलिस आयुक्तांनीच त्यांना दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.
विरोधकांचा हल्लाबोल
फडणवीसांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जर विनयभंग झालाच नाही, तर मग आधी असा दावा का करण्यात आला? महिला पोलिसाने तक्रार का केली? की या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला? असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत.
नागपुरात झालेल्या या संपूर्ण प्रकरणावरून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे दंगे अचानक का उसळतात? असा प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले आहे. तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारीच राज्यात अशांतता माजवत असल्याचा आरोप केला आहे.
वडेट्टीवारांचा आरोप आहे की पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावात असून खरी माहिती दडपली जात आहे. त्यामुळे हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आता या वादात पुढे काय ट्विस्ट येणार? सत्य काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Devendra Fadnavis : नव्या कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय आरोग्य सेवा केंद्र सज्ज
