नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीचं सावट गडद झालं आहे. शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भररस्त्यात निर्घृण हत्या झाली.
महाराष्ट्राच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कपिलनगर येथील म्हाडा कॉलनी चौकात शुक्रवारी सायंकाळी शहर हादरवणारी घटना घडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली. सहा जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून घरी जात असलेल्या कडू यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटनेनंतर काही क्षणांतच परिसरात खळबळ उडाली. नागपूरसारख्या शहरात रस्त्याच्या मधोमध खून होतो, आणि आरोपी पसार होतात, यावरून पोलिसांची कार्यक्षमता आणि गुन्हेगारीवरील नियंत्रण यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हत्या करण्यामागे वाद
प्राथमिक तपासानुसार अंकुश कडू यांचा काही दिवसांपासून जमीन व्यवहारासंदर्भात वाद सुरू होता. काही व्यक्तींशी त्यांचे आर्थिक आणि मालमत्तेसंबंधी मतभेद होते. या पार्श्वभूमीवरच ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या आरोपी फरार आहेत, मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे त्यांचे चेहरे स्पष्ट ओळखले गेले आहेत.
गेल्या काही महिन्यांत नागपूरमध्ये खून, चोरी, दरोडे आणि बलात्काराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः राजकीय व्यक्ती, उद्योजक आणि प्रॉपर्टी डीलर्स या टार्गेटवर असल्याचं चित्र उभं राहत आहे. अशा पार्श्वभूमीवर, अंकुश कडू यांची हत्या केवळ वैयक्तिक वैमनस्याची नसून, नागपूरच्या वाढत्या गुन्हेगारीच्या जाळ्याचं एक उदाहरण ठरत आहे. पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचे दावे सातत्याने केले जातात, मात्र अशा घटनांनी नागपूरकरांच्या मनात भीतीचं सावट पसरलं आहे.
Devendra Fadnavis : मतभेद विसरून कोणीही एकत्र येत असेल तर स्वागतच
नागपूरच्या सुरक्षिततेचं भविष्य
अंकुश कडू हे उद्धव ठाकरे गटाशी संबंधित असल्याने या हत्येला राजकीय रंगही चढू शकतो. माजी पदाधिकारी असूनही त्यांच्यावर भररस्त्यात हल्ला होतो, ही बाब संपूर्ण राजकीय वर्तुळात चिंता आणि संताप निर्माण करणारी आहे. या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या लाटाही उठण्याची शक्यता आहे. गुन्हेगारीचा फैलाव थांबवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपास गतीमान करण्यात आला आहे. मात्र, या घटनेने नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. सत्ताधाऱ्यांनी नागपूरसाठी गुन्हेगारीविरोधी विशेष पथकांची गरज ओळखून ठोस धोरण राबवणं ही काळाची गरज ठरत आहे.
