नागपुरातील वाहतुकीच्या गोंधळाला आव्हान देण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी नवीन मोहीम राबवण्याचा संकल्प घेतला आहे. ज्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार आहे.
स्मार्ट सिटी नागपूर जिथे मेट्रो अत्यंत वेगाने धावते. जिथे संत्र्यांचा सुवास दरवळतो. गगनाल्या भिडणाऱ्या इमारती उभ्या होतात, रस्ते चकाचक होतात आणि उड्डाणपुलाचे जाळे निर्माण होतात. ते नागपूर शहर अत्यंत वेगाने प्रवास करत आहे. पण या सगळ्या चमक-दमकात एक डोकेदुखी कायम आहे. ती म्हणजे रस्त्यांवरील वाहतुकीचा गोंधळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहनगरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण रस्त्यांवरील गोंधळ हा जणू नागपूरचा सावटच बनला आहे. चुकीच्या दिशेने धावणारी वाहने, ट्रिपल सीटवर उड्या मारणारी तरुणाई आणि नशेत बेदरकारपणे गाड्या हाकणारे चालक. हे सगळं पाहून नागपूरकरांचे डोकं गरगरतंय.
अपघातांचा वाढता आकडा आणि मालमत्तेचे नुकसान यामुळे हा प्रश्न आता गंभीर बनलाय. याच गोंधळाला आळा घालण्यासाठी एक खाकीधारी योद्धा पुढे सरसावलाय. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी (वाहतूक) लोहित मतानी. यापूर्वी त्यांनी जड वाहनांवर नो एन्ट्रीचा फर्मान काढून गाजावाजा केला होता. पण आता त्यांनी एक नवा डाव खेळलाय. 8 सप्टेंबर 2025 पासून नागपूरच्या रस्त्यांवर जड वाहनांना थेट प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. आता फक्त रात्री 10 ते सकाळी 6 वेळेतच जड वाहनांना शहरात येण्याची परवानगी असेल.
Nagpur : कोराडीतील महिलांच्या स्वप्नांना गती देणार ‘गारमेंट क्लस्टर’
प्रदूषण रोखण्याची योजना
मतानी यांनी प्रत्येक अडथळ्याचा बारकाईने अभ्यास करून हा निर्णय घेतलाय, जणू काही रस्त्यांवरील गोंधळाशी त्यांनी थेट युद्ध पुकारलंय. नागपूरच्या रस्त्यांवरील गोंधळाला शांत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी डायव्हर्जनचा खास मास्टरप्लॅन आखलाय. एमआयडीसी झोन, जबलपूर कटिंग रोड, अजनी, उमरगांव, इंदोरा रामनाथ सिटी रोड आणि कापसी पुलिया यासारख्या ठिकाणी डायव्हर्जन लावण्यात आले आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 वेळेत जड वाहनांना या रस्त्यांवर प्रवेश नाकारला जाईल. वाहतूक पोलिसांनी सांगितले, की यामुळे शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा थांबेलच. पण ध्वनी आणि वायू प्रदूषणापासूनही नागपूरकरांची सुटका होईल.
जड वाहनांमधून निघणारा धूर आणि त्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज आता शहरवासीयांना त्रास देणार नाही. याशिवाय, दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांना आऊटर रिंग रोडचा वापर करणं बंधनकारक असेल. नियम मोडणाऱ्यांना तब्बल 10 हजारांचा दंड ठोठावला जाईल, जणू काही वाहतूक पोलिसांनी ‘नियम पाळा, नाहीतर खिशाला कात्री’ असा इशारा दिलाय. रेल्वे मालटर्मिनल, अजनी, कलमना, खापरखेडा आणि कांदळी यासारख्या भागात जाणाऱ्या वाहनांना रिंग रोडवरूनच वळसा घालावा लागेल. वाहतूकदारांमध्ये या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. पण नागपूरकरांना मात्र यामुळे मोकळा श्वास घेता येणार आहे.
