
महाराष्ट्रात होळीनंतर हवामानात मोठे बदल झाले आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने संपूर्ण राज्यात थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे.
महाराष्ट्रात गेले काही दिवस हवामानाचा थांगपत्ता लागत नाहीये. कधी प्रखर उन्हाळ्याने जीव हैराण होतोय, तर कधी अचानक कोसळणाऱ्या पावसाने सारेच थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा होळीच्या सणानंतर तापमान झपाट्याने वाढेल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रच उलटं दिसलं. उन्हाळ्याच्या ऐन तोंडावर अवकाळी पावसाने हजेरी लावून राज्यभरात गोंधळ उडवून दिला. अवकाळी पावसासोबतच काही जिल्ह्यांमध्ये गारपिटही झाली. परिणामी, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी पावसामुळे भुईमूग, गहू, हरभरा आणि फळबागांचेही अक्षरशः पाणी पातळ झालं.
काही भागांत उन्हाच्या लाटेने तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गाठलं. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागांनी यंदा पावसाच्या आणि उष्णतेच्या तडाख्याने बेजार होऊन गेले आहेत. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो शेतकरी पावसाच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या भुईमूगाच्या शेंगा रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतो. डोळ्यांतून अश्रू आणि हतबल चेहऱ्यावरून या परिस्थितीची गंभीरता लक्षात येते. या व्हिडीओने राज्यभरातील शेतकऱ्यांच्या व्यथा पुन्हा एकदा अधोरेखित केल्या आहेत.

हवामानाचे लहरी संकट
सध्याचा शेतकरी फक्त निसर्गाच्या लहरीपणाशी नाही, तर सरकारी अनास्थेशीही लढतोय. खंडित वीजपुरवठा, बियाण्यांचा तुटवडा, हमीभावाचा प्रश्न, आणि मार्केट कमिट्यांमधील अपुऱ्या सुविधा या सगळ्यांनी बळीराजाचं जीवन अधिकच त्रासदायक बनवलं आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी या पार्श्वभूमीवर सरकारकडे ठोस पावलं उचलण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. अशावेळी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, असं पटोले यांनी ठणकावून सांगितलं आहे. ताज्या घडामोडींनुसार, अमरावती विभागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे.
हवामान विभागाने पुढील आठवडाभर जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. राज्यात सुरू असलेल्या या हवामानाच्या अनिश्चिततेने शेतकऱ्यांची मुळे हादरली आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते तापमान आणि बाजारातील अनिश्चितता या सगळ्या अडचणींनी बळीराजा थकला आहे. आता यावर उपाय म्हणून राज्य शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करणं ही काळाची गरज बनली आहे.
Yavatmal : लाचलुचपत विभागाचा लायसन्स घोटाळ्यावर जोरदार ब्रेक