महाराष्ट्र

Nagpur : रामटेकच्या डोंगररांगात उगम पावतोय निसर्ग संवादाचा नवा अध्याय

Ashish Jaiswal : पर्यटन, पर्यावरण अन् जनजागृती यांचा समन्वय साधनारा उपक्रम

Author

रामटेकच्या गडमंदिर परिसरात निसर्गप्रेमींसाठी एक नवे दालन साकारत आहे. मंत्री आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून ‘नेचर इंटरप्रिटेशन सेंटर’ची उभारणी सुरू असून पर्यटन आणि पर्यावरणाचा अनोखा संगम घडतोय.

रामटेकच्या गडमंदिर परिसरातील वनजमिनीवर उभारण्यात आलेले, पण वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) निवासस्थान अखेर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच जागेवर आता निसर्गप्रेमींसाठी एक नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे, ‘नेचर इंटरप्रिटेशन सेंटर’च्या उभारणीद्वारे.

या ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न भागात पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील असलेल्या राज्याचे मंत्री आशिष जयस्वाल यांच्या अथक पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे. त्यांनी वेळोवेळी राज्य शासन, पर्यटन विभाग व वन विभाग यांच्या समन्वयातून विविध पातळ्यांवर चर्चा करण्यात आली. या ठिकाणचा उपयोग योग्य दिशेने व निसर्गस्नेही पद्धतीने कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले.

जैवविविधतेचा अभ्यास

पूर्वी ही जागा पर्यटक निवासासाठी बांधण्यात आली होती. मात्र त्याचा अपेक्षित वापर झाला नाही. परिणामी, ही संरचना वर्षानुवर्षे निष्क्रिय होती. याच ठिकाणी आता निसर्गदालन Nature Interpretation Center साकारले जात आहे. हे केंद्र पर्यटकांना, विद्यार्थ्यांना व निसर्ग अभ्यासकांना जैवविविधतेचा अभ्यास, निसर्गसाक्षरता आणि पर्यावरणीय जाणीव निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

Chandrapur : पहलगाम हल्ल्यानंतर चांदा आयुध निर्माणीमध्ये युद्धसज्जता  

मंत्री आशिष जयस्वाल यांनी नुकतीच या स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधून उभारणीच्या कामांची माहिती घेतली आणि पुढील टप्प्यांसाठी आवश्यक सूचना दिल्या. रामटेकचा ऐतिहासिक वारसा आणि इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा संगम पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण बनू शकतो. या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. हे सेंटर म्हणजे निसर्गाशी संवाद साधण्यासाठीचं दार उघडणारा एक प्रकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरणीय जाणीव

रामटेक येथील हे केंद्र केवळ पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार नाही, तर स्थानिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही निसर्ग शिक्षणाचे केंद्रबिंदू ठरेल. पक्षी निरीक्षण, वनस्पतींची माहिती, निसर्गछायाचित्रण यांसारख्या उपक्रमांद्वारे हे केंद्र विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरणीय जाणीव निर्माण करेल. रामटेक केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक स्थळ न राहता, पर्यावरण रक्षणाची आणि जैवविविधतेची जाणीव वाढवणारे स्थान बनावे, अशी संकल्पना या केंद्रामागे आहे. प्रशासनाच्या योग्य समन्वयाचा परिणाम म्हणजे रामटेकच्या गडमंदिर परिसरात निसर्गाचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे.

हे ‘Nature Interpretation Center’ म्हणजे निसर्ग आणि समाज यांच्यातील नवा संवादस्थळ आहे. हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. भविष्यात हे केंद्र महाराष्ट्राच्या इतर भागांतील निसर्ग पर्यटनासाठीही एक ‘मॉडेल’ ठरू शकेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!