महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नवीन उपक्रम राबवण्याची मोहिम हाती घेतली आहे.
महाराष्ट्राच्या उपराजधानीत, एक नवं राजकीय चैतन्य जागृत होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट एक अनोखा उपक्रम घेऊन पुढे येत आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास या संकल्पनेला बळ देण्यासाठी, शुक्रवारी, 19 सप्टेंबर 2025 रोजी, नागपूरच्या भव्यदिव्य द एम्पायर हॉटेल येथे ‘राष्ट्रवादी चिंतन शिबिर’ आयोजित करण्यात आलं आहे. हे शिबिर केवळ चर्चेचा मंच नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ठोस उपाययोजना आखणारा एक प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे.
शिबिरात युवक, महिला, शेतकरी आणि कामगार यांच्या प्रश्नांना केंद्रस्थान देण्यात येणार आहे. शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, आत्मनिर्भरता, शेती आणि संघटनात्मक बांधिलकी यावर सखोल विचारमंथन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. आमदार संजय खोडके यांनी सांगितलं की, हे शिबिर म्हणजे पक्षाच्या सामाजिक बांधिलकीला नवं बळ देणारा आणि कार्यपद्धतीला गती देणारा उपक्रम आहे.
Parinay Fuke : सत्तेच्या खुर्चीला नाही, जनतेच्या हाकेला प्राधान्य
पक्षाची सामाजिक बांधिलकी
शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारसरणीवर आधारित, अजित पवार यांनी प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हे चिंतन शिबिर म्हणजे केवळ एक बैठक नाही, तर समाजाच्या प्रत्येक स्तराला जोडणारा आणि सर्वांगीण विकासाला दिशा देणारा एक संकल्प आहे. या शिबिरातून पक्षाच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी निवडणुकींसाठीही रणनीती ठरणार आहे. नागपूरच्या या शिबिरात पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, प्रदेश कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि जवळपास 300 ते 400 प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
मर्यादित पण निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत होणारं हे शिबिर पक्षाच्या भविष्यातील कार्ययोजनेचा पाया रचणार आहे. विशेष म्हणजे, अमरावती विभागातूनही राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि सहकारी या शिबिरात सहभागी होणार आहेत, असं आमदार संजय खोडके यांनी सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने या शिबिराच्या माध्यमातून आपली ताकद एकवटण्याचा निर्णय घेतला आहे. हे शिबिर पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवं दृष्टिकोन देणार असून, जनतेच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, तरुणांना रोजगार, महिलांना सुरक्षा आणि समाजाच्या सर्व स्तरांना सक्षम करण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.
नागपूरच्या या चिंतन शिबिरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. आता या शिबिराच्या माध्यमातून तीच बांधिलकी अधिक दृढ होणार आहे.