महाराष्ट्र

Charan Waghmare : शेतकऱ्याचं पोट रिकामं, पण सत्तेचं मन भरलंय

NCP : बच्चू कडूंना राष्ट्रवादीच्या चरण वाघमारे यांचा पाठिंबा

Author

माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. कडू यांच्या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे.

सत्तेच्या पायऱ्या चढणाऱ्यांनी जर जमिनीच्या मातीचा सुगंध विसरला, तर त्या मातीसाठी लढणारे जन्म घेतात. आज मोझरीच्या भूमीत बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनात अशाच एका आवाजाला बळ मिळालं. माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांचं नैतिक आणि राजकीय समर्थन बच्चू कडू यांना मिळालं.

चरण वाघमारे यांनी मोझरी येथे प्रत्यक्ष भेट देत बच्चू कडू यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आंदोलनाच्या उद्देशाला त्यांनी आपला ठाम पाठिंबा दिला असून, हे आंदोलन जनतेच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी आहे. शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा”, अशी स्पष्ट भूमिका मांडली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना वाघमारे म्हणाले, झोपलेल्या सरकारला जाग आली की नाही, हे अजूनही शंकाच आहे. बावनकुळे मंत्री असताना मी आमदार होतो, त्यामुळे त्यांच्या बोलण्यातील खरेपणा व खोटेपणा दोन्हीचा मी जवळून अनुभव घेतला आहे.

खोटी आश्वासनं

वाघमारे पुढे म्हणाले, फक्त नावावर शेती असल्यामुळे कोणी शेतकरी होत नाही. खरा शेतकरी तोच जो रानात राबतो. मोठे उद्योगपती केवळ कागदोपत्री शेतकरी असून, शेतात प्रत्यक्ष काम करणाऱ्यालाच खरा शेतकरी म्हटलं पाहिजे. याच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू आज उपोषणाला बसले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांवरही वाघमारे यांनी सरकारला लक्ष्य केलं. फडणवीस सरकार पारदर्शक असल्याच्या जाहिराती आपण पाहतो. पण प्रत्यक्षात, निवडणुकीपूर्वी ज्या विकास योजनांची यादी सादर करण्यात आली होती, त्या केवळ आश्वासने राहिली. निवडणूक संपल्यानंतर सहा महिन्यांतच ती विसरली गेली.

चरण वाघमारे म्हणाले, लाडक्या बहिणींना पुढे करून, ईव्हीएममध्ये घोळ करून आणि जुगाड करून महायुती सरकार सत्ता मिळवते, आणि मग स्वतःचं दिलेलं एकही आश्वासन पाळत नाही. तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी आंदोलन केल्याबद्दल त्यांनी बच्चू कडूंना विशेष धन्यवाद दिले. तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत त्यांच्या विचार आणि कर्मामुळे झाले. सरकारने त्यांच्या विचारांतून शिकवण घ्यायला हवी. जर त्यांचे विचार या सरकारला खरोखरच समजले असते, तर आज कडूंना उपोषणाची वेळ आली नसती, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Local Body Elections : निवडणुकीचा फटाका फुटणार दिवाळीनंतर ? 

सरकारवर घणाघात

सरकारच्या कृषी धोरणावर घणाघात करत ते म्हणाले, शेकडो जमिनी हडप करून काही लोक शेतकरी बनत आहेत, पण त्यांना खरा शेतकरी म्हणता येणार नाही. जे जमिनीवर घाम गाळतात, तेच खरी शेती करत आहेत. योजना आणि सबसिडी यांचा फायदा मात्र याच भू-मालकांनाच होतो, आणि खरा शेतकरी मात्र केवळ ठेका घेऊनच राहतो. ते पुढे म्हणाले, निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव, उत्पन्न दुप्पट करणे, अनेक योजना इत्यादींचा वर्षाव केला होता. मात्र निवडणुकीनंतर हेच सरकार त्या आश्वासनांपासून माघार घेत आहे. हे फसवणुकीसारखंच आहे.

शेवटी वाघमारे यांनी बच्चू कडूंना अभिवादन करत म्हटलं, तुमचं आंदोलन केवळ उपोषण नाही, ही जनतेच्या वेदनांची आरोळी आहे. सरकारने ती ऐकली नाही, तर जनतेचा रोष त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन हे केवळ एक राजकीय आंदोलन नसून, खऱ्या अर्थाने जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उचलणारे लोकशक्तीचे प्रतीक ठरले आहे, असे वाघमारे म्हणाले. आता लक्ष आहे, शासनाच्या पुढील पावलांकडे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!