नितीन गडकरी यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा राजकीय षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 2012 मधील बदनामीच्या कटाची पुनरावृत्ती करत भाजपच्या एका गटाने निराधार आरोपांचा खेळ सुरू केल्याचे तिवारी यांचे म्हणणे आहे.
राजकीय वातावरणात अचानक निर्माण झालेल्या उलथापालथीमुळे चर्चेचे केंद्रबिंदू ठरलेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याभोवती एक प्रकारचा गुपितमय वेढा पडला आहे. अमरावतीतील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी भाजपच्या अंतर्गत एका गटावर गंभीर आरोप करत, हा प्रकार पूर्वीच्या काळातील घटनेच्या पुनरावृत्तीचा असल्याचे सांगितले आहे. या आरोपांमुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि सत्तास्थानांच्या खेळींच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. तिवारी यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांमुळे हे षड्यंत्र अधिक तीव्र झाले आहे.
डिसेंबर 2012 मधील घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना तिवारी यांनी सांगितले की, तेव्हा गडकरी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेत्यांनी ‘तृप्ती समूहा’च्या साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचे आरोप केले होते. हे आरोप नंतर खोटे ठरले आणि केजरीवाल यांना बिनशर्त माफी मागावी लागली. तिवारी यांच्या मते, त्या काळात ‘गुजरात लॉबी’च्या वतीने हे षड्यंत्र रचले गेले होते. आता ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये त्याचीच पुनरावृत्ती होत आहे.
Municipal Elections : अकोला जिल्हा परिषदेवर ठाकरे गटाची मुसंडी
पदाचा दुरुपयोग
सध्या प्रसारित होत असलेल्या बातम्यांमध्ये गडकरी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुलांना शेकडो कोटींचा फायदा मिळवून दिल्याचे सांगितले जात आहे. तिवारी यांनी भाजपच्या आयटी सेलवर शेकडो कोटी रुपये खर्च केल्याचा गंभीर आरोप केला असून, हे सर्व आरोप निराधार आणि वेदनादायक असल्याचे नमूद केले. गडकरी यांच्या 40 वर्षांच्या कृषी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगताना तिवारी यांनी स्पष्ट केले की, तेव्हा त्यांची मुले शाळेत असतानाच हा उपक्रम सुरू झाला होता. ब्राझीलसारख्या देशांमध्ये बायोगॅस प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेने इथेनॉलला परवानगी दिली. ज्यामुळे पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रण शक्य झाले. यामुळे संबंधित कंपन्यांचे शेअर्स 300 पटींनी वाढले, पण ही किंमत काल्पनिक असल्याचे तिवारी यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या खनिज वैभवातून रोजगाराची भरभराट
इथेनॉल उत्पादनाचे केंद्र पश्चिम महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि बंगालच्या गंगापट्ट्यात आहे, तर पश्चिम विदर्भात ते केवळ 5 टक्के आहे. अशा परिस्थितीत पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप मूर्खपणाचा असल्याचे तिवारी यांनी ठणकावून सांगितले. हे आरोप केवळ राजकीय हेतूने रचले गेले आहे. गडकरी यांच्या विकासकामांना आव्हान देण्याचा प्रयत्न आहे. या घटनांमुळे राजकीय क्षेत्रात नव्या चर्चांना उधाण आले असून, पक्षांतर्गत एकजुटीची परीक्षा होत आहे.
