महाराष्ट्र

Nitin Gadkari : हास्याच्या रंगमंचावरून समाजात समानतेचे वादळ 

Maharashtrachi Hasya Jatra : गडकरींचा गुणांना मान देणारा संदेश

Post View : 40

Author

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ जिंकतेय लोकांच्या मनं, पण त्या मागे आहे एका लढवय्या समाजाचं गुणांच्या जोरावर उभं राहणं. या कलाकारांमधूनच बाबासाहेबांचं स्वप्न दिसतंय आणि त्याचं सारगर्भ भाष्य केलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सध्या घराघरात गाजणारा, हास्याचं मोहोळ पेरणारा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा एक लोकप्रिय कार्यक्रम. या कार्यक्रमातील कलाकारांनी केवळ प्रेक्षकांच्या मनात नव्हे, तर संपूर्ण मनोरंजन विश्वात आपली छाप उमठवली आहे. पण यामागे असलेली खरी जादू म्हणजे त्यांच्या गुणांचा विजय. याच गोष्टीला आपल्या भाषणातून अधोरेखित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हास्यजत्राच्या कलाकारांपासून ते बाबासाहेबांच्या विचारांपर्यंत एक प्रभावी विचारधारा उलगडली आहे.

राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त नागपूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेच्या मंचावर गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी समाजातील गुणांना, मेहनतीला, आणि नेतृत्व क्षमतेला महत्त्व देण्याचा अत्यंत सकारात्मक संदेश दिला. गडकरी म्हणाले, माणूस जात, धर्म किंवा पंथावरून मोठा होत नाही. तो आपल्या गुणांनी मोठा होतो. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपल्याला जातीच्या चौकटी मोडून काढत, गुणांच्या आधारावर समाज घडवावा लागेल.

दलित समाजातील कलाकार

गडकरी पुढे म्हणाले, आज दलित समाजातील अनेक कलाकार, डॉक्टर, वकील, अभियंते, उद्योजक आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अनेक कलाकार हे दलित समाजातून आलेले आहेत. परंतु त्यांनी आपल्या हसवणाऱ्या प्रतिभेने अख्ख्या महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. हीच बाबासाहेबांची संकल्पना होती, क्षमता आणि गुणांच्या आधारावर समाजात स्थान मिळावं.

गडकरींनी न्यायमूर्ती भूषण गवई यांचे उदाहरण देत सांगितले, “एका दलित कुटुंबातून आलेला व्यक्ती आज देशाच्या सर्वोच्च न्यायपीठाच्या सर्वोच्च पदावर पोहोचतो, हीच गुणांची आणि कर्तृत्वाची कमाल आहे. यावेळी त्यांनी नागपूरचे सुप्रसिद्ध संगीतकार राम-लक्ष्मण जोडीचा देखील विशेष उल्लेख केला. “राम-लक्ष्मण यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून देशभरात लोकप्रियता मिळवली. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. त्यांनी कोणतीही जात मांडली नाही; त्यांनी आपला ‘गुण’ दाखवला. आज हास्यजत्रेतील कलाकारही याच परंपरेचे प्रतिनिधित्व करतात, असे गडकरी म्हणाले.

Harshwardhan Sapkal : संस्कृतीच्या रणभूमीत मराठी तलवार पुन्हा उगारली 

जात नव्हे, कार्य महत्त्वाचं

गडकरी पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलित नव्हे तर संपूर्ण देशासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचं स्वप्न होतं, सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि एक गुणाधिष्ठित समाज. ते म्हणाले, आपल्याला संत-महापुरुषांच्या जातीकडे पाहण्याची गरज नाही, त्यांच्या कार्याकडे पाहावं लागतं. त्यांच्या विचारांनी चालणं हेच खरं श्रद्धांजली वाहणं आहे.

गडकरींनी भाषणाच्या अखेरीस ठामपणे सांगितले की, समाजातील तळागाळातील लोकांसाठी बोलून नव्हे, तर कृती करूनच बदल घडवता येतो. बाबासाहेबांचा संघर्ष भाषणांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतींनी सिद्ध झाला होता. आणि त्याच विचारांनी आपण आजही चालले पाहिजे. नितीन गडकरींचं हे भाषण केवळ सामाजिक समतेचा संदेश नव्हे, तर गुणांना दिलेलं मानाचं प्रमाणपत्र आहे. हास्यजत्रेच्या रंगीबेरंगी मंचावरून जेव्हा गुणांना प्रतिष्ठा मिळते, तेव्हा ते केवळ करमणूक राहत नाही, ती एक सामाजिक क्रांती होते.

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण् यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात द लोकहित लाइव्हपासून केली. त्यांना ऑनलाइन मीडिया आणि तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!