
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये सी.ए. विद्यार्थ्यांच्या परिषदेत हटके विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली. सांडपाणी, कचरा आणि राख यांच्यातून संपत्ती निर्माण करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाने नव्या अर्थविचाराला चालना मिळाली.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि हटके दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. शनिवारी नागपुरात आयोजित सी.ए. विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा जनजागृती आणि वादाचं मिश्रण असलेलं वक्तव्य करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. गडकरी म्हणाले, पूर्वी नालीतून वाहणारे घाण पाणी कुणालाच उपयोगाचं नव्हतं, उलट ते पर्यावरणासाठी घातक ठरत होतं. मात्र आज या सांडपाण्यालाच सोन्याचा मोल लाभलंय. त्यांनी सांगितलं की, नागपूर महापालिकेने कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी सांडपाणी शुद्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यातून वर्षाला 300 कोटींचं उत्पन्न मिळू लागलंय.
सांडपाणीच नव्हे, तर राखही आता उत्पन्नाचं साधन बनली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. औष्णिक प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचाही पूर्वी प्रश्न होता, पण आता त्यातून वीट बनवल्या जातात. महामार्गासाठी वापर होतो. अनेक ठिकाणी त्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कचऱ्याची किंमत आता वाढते आहे. भविष्यात कचऱ्यासाठी दंगली होतील, हे मी सांगतो आहे, असं गडकरी यांनी ठामपणे भाकीत केलं. जगभरातील प्रगत देशांमध्ये कचऱ्यापासून वीज निर्माण होते. भारतातही अशा नावीन्यपूर्ण प्रकल्पांची सुरुवात लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी दिलेल्या उदाहरणातून स्पष्ट होतं की अपारंपरिक मार्गांमधून आर्थिक सुबत्ता मिळवण्याची शक्यता किती मोठी आहे.

Sudhir Mungantiwar : प्रतीक्षेतल्या प्रवासांना दिशा देणारा मुनगंटीवारांचा विकास मार्ग
भारतीयांची दुहेरी क्रांती
गडकरींनी आपल्या मिश्कील शैलीत भारतीयांची एक वेगळी विशेषताही स्पष्ट केली. भारतीय नागरिक लोकसंख्या वाढवण्यात तज्ज्ञ आहेतच, पण वाहनांची संख्या वाढवण्यातही मागे नाहीत, असं सांगत त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या वाढीवर भाष्य केलं. रस्ते विकास आणि महामार्गांवरील महसूलाचाही त्यांनी उल्लेख केला. सध्या राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमधून 56 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळतं आहे. मात्र, हीच रक्कम पुढील दोन वर्षांत 1 लाख 40 हजार कोटींवर जाईल. 15 वर्षांत 12 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा गडकरींचा विश्वास आहे.
वर्धा रोडवरील एका प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी नागपूर महापालिकेतील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर टीका केली. डिफेन्सची रेल्वे लाईन असलेली जमीन 2.5 कोटींना घेतली, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यावेळी विरोध होता. तरीही ती जमीन घेतल्यावर ऑरेंज स्ट्रीटसारख्या प्रकल्पातून 900 कोटी रुपये महापालिकेला मिळाले. अजून प्रकल्प पूर्ण झाल्यावर 2 हजार 500 कोटी रुपये मिळणार आहेत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. नितीन गडकरींच्या भाषणातून स्पष्ट होतं की त्यांनी ‘कचरा’ या शब्दालाही अर्थ दिला आहे. त्यांच्या दृष्टिकोनात वाया जाणाऱ्या गोष्टीतून साधन निर्माण करण्याची मानसिकता आहे. त्यांची ही ‘कचऱ्याची अर्थव्यवस्था’ आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आदर्श ठरू शकते.
Raj – Uddhav Allience : एक मराठीपणाचा वीर, दुसरा सत्तेचा गंभीर