नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील भेदभाव आणि जातीवर आधारित राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला.
नागपूरमध्ये नुकतेच झालेल्या सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक समतेच्या विषयावर भाष्य करत जातिवादी मानसिकतेवर जोरदार प्रहार केला. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन त्याच्या जात, धर्म, भाषा किंवा लिंगावरून नव्हे, तर त्याच्या गुणवत्तेवरून केले पाहिजे.
गडकरी यांनी असेही स्पष्ट केले की, जात आणि धर्माच्या आधारे मते मागण्याच्या राजकारणाला ते कधीही पाठिंबा देणार नाहीत. ते म्हणाले, ‘कोणत्याही व्यक्तीचे अस्तित्व हे त्याच्या विचारांमुळे, कर्तृत्वामुळे आणि गुणवत्तेमुळे असते, त्याच्या जातीमुळे किंवा धर्मामुळे नव्हे. राजकारणात असूनही, गडकरी यांनी हा निर्धार व्यक्त केला की, जर मतांसाठी जातिवादी धोरणे स्वीकारावी लागतील, तर ते त्याऐवजी पराभव स्वीकारतील.
BJP : पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून संदीप जोशी पुन्हा मैदानात
राजकारणाला विरोध
गडकरी यांनी आपल्या भाषणात राजकारणात वारंवार जातीय ओळख पुढे करणाऱ्या लोकांवर टीका केली. त्यांनी एका प्रसंगाचा उल्लेख करत सांगितले की, अनेकदा लोक त्यांच्या जातीचा आधार घेत त्यांच्याकडे आले, मात्र त्यांनी असे राजकारण करण्यास ठाम नकार दिला. आपल्या मतांची ठाम मांडणी करत ते म्हणाले, ‘जो करेगा जात की बात, उसके कस के मारूंगा लात.’ त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.
गडकरी यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना या वक्तव्यामुळे राजकीय नुकसान होऊ शकते, असे सांगितले. मात्र त्यांनी स्पष्ट केले की, मला पराभवाची भीती नाही. निवडणुका हरल्याने कोणी आपला जीव गमावत नाही, पण तत्त्वांशी प्रतारणा करून जिंकणे ही मोठी हानी आहे. त्यांनी हेही नमूद केले की, लोकांना जातीवर आधारित ओळखीत अडकवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या गुणवत्तेवर संधी द्यायला हवी.
महत्त्वाचा संदेश
गडकरी यांनी त्यांच्या या ठाम भूमिकेद्वारे भारतीय राजकारणातील जातीयवादाच्या प्रथांना आव्हान दिले आहे. भारतात अनेक नेते जातीच्या आधारे आपली राजकीय समीकरणे जुळवतात. मात्र गडकरींनी असा दृष्टिकोन कटाक्षाने नाकारला आहे. त्यांनी तरुणांना आवाहन केले की, नवीन पिढीने जातीच्या पलीकडे पाहायला हवे आणि व्यक्तीच्या कर्तृत्वावर भर द्यायला हवा.
भारतीय राजकारणात जातीचा प्रभाव प्रचंड आहे. अनेकदा निवडणुकीत जात हे महत्त्वाचे समीकरण मानले जाते. अशा परिस्थितीत, नितीन गडकरींसारख्या वरिष्ठ नेत्याने अशा प्रकारच्या धोरणांना विरोध करणे, ही एक महत्त्वाची बाब आहे. त्यांनी आपले मत ठामपणे मांडून राजकीय नेत्यांनी तत्त्वनिष्ठ राहण्याची गरज अधोरेखित केली आहे.
मला सत्ता, मतं किंवा विजयापेक्षा माझ्या तत्त्वांचा अधिक अभिमान आहे, असे सांगत गडकरींनी जातिवादाच्या राजकारणावर आपला विरोध नोंदवला. त्यांचे हे वक्तव्य भारतीय राजकारणात एक नवीन दिशा देणारे ठरू शकते.
