केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात विमानासारख्या सुविधांनी सुसज्ज, इलेक्ट्रिक आणि आरामदायी बसेस सुरू करण्याचा नवा प्रकल्प हाती घेतला आहे.
भारताच्या रस्त्यांना सुसाट गती देणारे आणि प्रवासाला सुरक्षित बनवणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या दूरदृष्टीने देशवासीयांना आश्चर्यचकित केले आहे. आता ते थेट आकाशातील ऐषोआराम जमिनीवर आणण्याच्या तयारीत आहेत. होय, ज्याप्रमाणे विमानातून प्रवास करताना आपण आकाशात तरंगत असल्याचा अनुभव घेतो, तसाच अनुभव आता रस्त्यावरून प्रवास करताना मिळणार आहे. नितीन गडकरींच्या नव्या संकल्पाने भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांती येणार आहे. त्यांनी जाहीर केलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
बस फक्त वाहनच नसतील, तर त्या एका प्रवासातील स्वप्नवत अनुभवाचा भाग असतील, जिथे प्रवाशांना विमानासारख्या सुविधा मिळणार आहेत. या बस विमानाच्या केबिन सारख्या आलिशान असतील. प्रत्येक प्रवास हा एक आनंददायी अनुभव असेल. जिथे प्रवाशांना चहा, कॉफी, फळे आणि थंड पेयांचा आनंद घेता येईल. विशेष म्हणजे, या बसच्या आत विमानाप्रमाणेच ‘बस होस्टेस’ असतील. ज्या प्रवाशांची काळजी घेतील आणि त्यांना घरापासून दूर घरासारखा अनुभव देतील. टाटाच्या सहकार्याने हा प्रकल्प आकाराला येत आहे. आणि याची सुरुवात गडकरींच्या गृहनगरात, नागपूरपासून होत आहे. या बसच्या भाड्याबाबत बोलायचे झाले, तर डिझेल बसच्या तुलनेत हे भाडे तब्बल 30 टक्के कमी असेल.
नागपूर पायलट प्रकल्प
सामान्य माणसालाही हा ऐषोआरामी प्रवास परवडणारा ठरेल. या इलेक्ट्रिक बसच्या प्रत्येक आसनावर तुम्हाला वातानुकूलन, आरामदायी खुर्च्या आणि समोर लहान टेलिव्हिजन स्क्रीनसह लॅपटॉप ठेवण्याची सोय मिळेल. एकूण 135 प्रवाशांना सामावून घेणाऱ्या या बस फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. अवघ्या 40 सेकंदात चार्ज होऊन या बस पुढील 40 किलोमीटरचा प्रवास सहज पूर्ण करतील. प्रवासादरम्यान बस होस्टेस तुम्हाला फळे आणि पॅक केलेले खाद्यपदार्थ देतील. ज्यामुळे तुमचा प्रवास केवळ आरामदायीच नाही, तर संस्मरणीयही होईल. या योजनेचा पायलट प्रकल्प नागपूरमध्ये सुरू झाला असून, याची किंमत प्रति किलोमीटर 35 ते 40 रुपये इतकी आहे. ही किंमत सामान्य प्रवाशांना परवडणारी आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत क्रांतिकारी आहे.
नितीन गडकरी यांनी केवळ रस्त्यांपुरतेच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराने पायाभूत सुविधांमध्येही क्रांती घडवण्याचा मानस व्यक्त केला आहे. विशेषतः हिमाचल आणि उत्तराखंड सारख्या डोंगराळ भागात रस्ते, पूल आणि बोगदे बांधण्यासाठी एआयचा उपयोग केला जाणार आहे. गडकरींच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता रस्ते वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणेल. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे भारतातील प्रवास केवळ वेगवान आणि सुरक्षितच नाही, तर एक आनंददायी अनुभव बनणार आहे. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाहतूक व्यवस्था आधुनिकतेच्या शिखराकडे झेप घेत आहे. या इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून सामान्य माणसाला विमानासारखा अनुभव देण्याचा त्यांचा संकल्प प्रत्यक्षात येत आहे. जपानसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील रस्ते आणि प्रवासाचा चेहरा बदलण्याची ही योजना लवकरच देशभरात लागू होईल, अशी आशा आहे.
Lohit Matani : देवा भाऊंच्या गावात डीसीपींनी ओढली नो-पार्किंगची रेघ
