विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा छडा आजही नागपूर पोलिसांना लावता आलेला नाही. माजी आणि विद्यमान गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातील पोलिसांना हे आरोपी सापडले का नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तेव्हाचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. नोव्हेंबर महिन्यातील या खळबळजनक घटनेला आता जवळपाच सहा महिने पूर्ण होतील. मात्र अद्यापही नागपूर ग्रामीण पोलिसांना माजी गृहमंत्र्यांवर हल्ला करणारे गवसलेले नाही. विद्यमान गृहमंत्र्यांनीही यासाठी पोलिसांवर कोणताही दबाव टाकलेला नाही. त्यामुळं देशमुखांवर हल्ला करणारे चार बाइकस्वारांना ‘जमीन खा गई या आसमान निगल गया’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हल्ला झालेला तेव्हापासून आजपर्यंत नागपूर ग्रामीण पोलिस दलाचे एसपी पोद्दार हेच आहेत. परंतु आरोपीच्या मुसक्या आवळत सर्वसामान्यांना‘हर्ष’ होईल असं काहीच ते किंवा त्यांचे अधिकारी करू शकलेले नाही. त्यामुळं देशमुखांवरील हल्लेखोरांना शोधण्यासाठी आता स्कॉडलॅन्ड यार्ड पोलिस बोलवायची की इंटरपोल असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशमुखांवर झालेल्या हल्ल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीपासून देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच हल्ला चढविला होता. देशमुखांच्या मदतीसाठी अनेक नेते, सामाजिक कार्यकर्तेही नागपुरात तळ ठोकून होते. निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच देशमुख यांच्या वाहनावर काहींनी तुफान दगडफे केली होती. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झालं होतं.
गुंतागुंत कायम
देशमुख समर्थकांनी हल्ल्यानंतर मोठं आंदोलन केलं होतं. भाजपनं हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र अद्यापही या हल्ला प्रकरणतील गुंतागुंत कायम आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांचं बयाण अद्यापही जगापुढं आलेलं नाही. काटोलच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर पंकज करंडे यांनी पोलिसांना देशमुख यांना केवळ खरचटल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं सूज आल्याचं नमूद होतं. मात्र देशमुख यांना सिटी स्कॅन करण्यासाठी नागपुरातील मॅक्स या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. देशमुखांवर हल्ला करणारे चौघे दोन बाइकवर आले होते. नागपूर ग्रामीण पोलिसांनी अनेक तासांचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. पण दोन बाइकवर आलेले चार जण सापडलेच नाही. परिणामी हल्लेखोर भुयारी मार्ग तयार करून तर देशमुखांपर्यंत पोहोचले नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेल्या दगड आठ किलोचा होता. एवढा मोठा दगड आणेपर्यंत देशमुश यांच्या आसपासचे लोक काय करीत होते हे देखील अद्याप अनुत्तरीत आहे. या दगडफेकीमुळं कारची विंडस्क्रिन देखील पाहिजे तशी फुटली नव्हती. बोनेट चपलेले नव्हते. विशेष म्हणजे बोनेटवर एक स्क्रॅचही नव्हता. अनिल देशमुख यांच्या वाहनावर दोन दगडं फेकण्यात आलेत. दुसऱ्या दगडाचं वजन दोन किलो होतं. हा दगड देशमुख यांच्या पायाजवळ कारच्या आत पडला होता. पण कोणताही काच न फुटता हा दगड कारच्या हात गेलाच कसा, हा प्रश्न अनेकांना चक्रावरणारा आहे.
Ladki Bahin : निवडणुकीपूर्वी योजना राबवा, सत्ता येताच पंधराशेतच भागवा
फॉरेन्सिक अहवालाचं काय?
पोलिसांना हल्ल्याच्या ठिकाणावर रक्ताचे कोणतेही थेंब दिसले नाहीत. दुचाकीच्या टायरच्या मार्कचा पत्ता नाही. एवढा मोठा हल्ला झाला तरी कोणीही प्रत्यक्षदर्शी नाही. दुचाकीच्या नंबर प्लेट क्रमांकाचा पत्ता नाही. भारशिंगी गावापर्यंत कोणी हल्लेखोरांना पाहिले नाही किंवा सीसीटीव्हीमध्ये देखील ते कैद झाले नाहीत. त्यामुळं रहस्यमय पद्धतीनं येणारे हे हल्लेखोर कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यामुळं त्यांच्या सारख्या व्यक्तीवर हल्ला होणं ही निश्चितच गौरवास्पद बाब नाही. विशेष म्हणजे हल्ल्याला अनेक महिने उलटल्यानंतरही नागपूर ग्रामीण पोलिसांना याचा छडा लावता आलेला नाही.
नागपूर ग्रामीण पोलिसांचं हे मोठं अपयश आहे. महाविकास आघाडीतील एकानंही देशमुख यांच्यावरील हल्ल्याबाबत विधिमंडळात आवाज उठवलेला नाही. हल्ल्यात देशमुखांच्या जीवाला धोका झाला असता तर? याचं सोयरंसूतकही आघाडीच्या नेत्यांना दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदा व सुव्यवस्थेवरून महायुती सरकारवर टीका होत आहे. अशात इतक्या गंभीर प्रकरणाचं ‘दूध का दूध और पानी का पानी’ करण्याचं धाडसही गृह विभाग दाखवू शकलेलं नाही. यात दोषी कुणाला ठरवायचं? बयाण न देणाऱ्या देशमुखांना? तपास न करणाऱ्या नागपूर ग्रामीण पोलिसांना, आवाज न उठविणाऱ्या आघाडीच्या नेत्यांना की तपासाकडं दुर्लक्ष सहन करणाऱ्या सरकारला, असा प्रश्न अनुत्तरीत आहे.
