राज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीचा उत्साह फुलला आहे, गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत राजकीय पक्षही आपल्या सहभागाने रंग भरत आहेत.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया या गजराने गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. गणेशोत्सवाच्या गजरात संपूर्ण महाराष्ट्र दहा दिवस बाप्पाच्या भक्तीत रंगून गेले. बाप्पाचे आगमन ज्या उत्साहात झाले, तितक्याच जल्लोशात अनंत चतुर्दशीला त्यांचा निरोप घेतला जात आहे. ढोल-ताशांचा गडगडाट, फुलांचा वर्षाव आणि भक्तांचा ‘मोरया रे’चा जयघोष यामुळे महाराष्ट्रातील रस्ते बाप्पाच्या रंगात न्हाले. पण या उत्सवाच्या निमित्ताने अकोल्यात राजकीय पक्षांनीही आपली शक्ती दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांचा सहभाग आणि त्यांचे शक्तीप्रदर्शन यांनी उत्सवाला एक वेगळाच रंग चढवला.
विसर्जन मिरवणुकीत बाप्पाच्या भक्तीचा उत्साह तर होताच, पण त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळीही रंगत गेली. प्रत्येक राजकीय पक्षाने बाप्पाच्या चरणी यशाचा मोदक मागताना, आपापली ताकद दाखवण्याची संधी साधली. अकोल्यात मिरवणुकीच्या या रंगतदार सोहळ्यात राजकीय नेते आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले. कामगार मंत्री आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी मानाच्या तीन गणपतींचे पूजन करून मिरवणुकीला शुभारंभ केला. पण यंदा मिरवणुकीत एक शून्यता जाणवली, ती म्हणजे अकोला पश्चिमचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांची. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मिरवणुकीत आपली उपस्थिती दणक्यात लावली आहे.
पोलिसांची कडक सुरक्षा
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शहरप्रमुख राजेश मिश्रा, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, रमेश गायकवाड, उपशहरप्रमुख भूषण इंदोरिया, अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, भाजप आमदार वसंत खंडेलवाल, जयंत मसने, माजी नगरसेवक गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा आणि विसर्जन मिरवणूक समितीचे मोतीसिंह मोहता यांनी गणेश मंडळांचे स्वागत करत आपली ताकद दाखवली. प्रत्येक नेत्याचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचा जल्लोश यामुळे मिरवणूक एका उत्सवापेक्षा राजकीय शक्तीप्रदर्शनाचा सोहळा बनला. या सगळ्या धामधुमीत पोलिसांची कसरतही तितकीच तीव्र होती.
मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांनी बारीक नजर ठेवली होती. विशेष म्हणजे, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्याच दिवशी अकोल्यात ईदची मिरवणूक होणार आहे. यासाठी मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा राखत आपली मिरवणूक एक दिवस पुढे ढकलली. या संवेदनशीलतेमुळे अकोल्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले. पण या मिरवणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याची संधी साधली.गणेशोत्सव हा भक्ती आणि उत्साहाचा सण, पण अकोल्यात तो राजकीय रंगातही रंगला. प्रत्येक पक्षाने आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुढे करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मिरवणुकीत सहभागी होऊन नेते केवळ बाप्पाचे दर्शन घेत नव्हते, तर जनतेच्या मनातही स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत होते.
Sudhir Mungantiwar : ढोल-ताशांच्या गजरात रुग्णांच्या हाकेला धावले आमदार
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे शक्तीप्रदर्शन म्हणजे मतदारांना प्रभावित करण्याचा एक भागच होता. पण या सगळ्यात बाप्पा मात्र शांतपणे आपल्या भक्तांचे साकडे ऐकत, सर्वांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देत गावाकडे निघाले. आता पुढील मिरवणुकीत आणि निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
