
भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाची परंपरा कायम राखत, सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर सडेतोड भूमिका मांडली आहे.
राजकारणात कोलाहल असतो, अफवा असतात, पण काही नेते आपल्या स्पष्टवक्तेपणाने गोंधळाला पूर्णविराम देतात. भाजपचे नेते, माजी मंत्री आणि विदर्भाच्या राजकारणात ‘वजनदार’ ओळख असलेले आमदार डॉ. परिणय फुके हे असेच नेतृत्व. त्यांनी पुन्हा एकदा आपली ठाम आणि प्रामाणिक शैली दाखवत, चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी फुके यांनी संवाद साधला.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप किंवा फुके यांच्यावर टीका केल्याच्या चर्चांवर डॉ. फुके यांनी स्पष्टपणे पडदा टाकला. भोंडेकर यांनी माझ्यावर किंवा पक्षावर कोणतीही टीका केलेली नाही, ही अफवा असून भोंडेकर यांनी स्वतः मला फोन करून स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या वक्तव्याचा संबंध पक्षांतर्गत मतभेदांशी आहे,” असं फुके यांनी ठणकावून सांगितलं.

Prakash Ambedkar : अर्थव्यवस्थेच्या ताब्यासाठी जागतिक महासत्ता भिडणार
सल्ल्याशिवाय निर्णय नाही
डॉ. फुके यांनी पुढे ठामपणे नमूद केलं की, मला जर शिंगावर घेतलं, तर शिंगच तुटून जातील, माझं वजनच इतकं आहे. हे विधान केवळ शब्दांचे नाही, तर त्यांच्या राजकीय प्रभावाचेही दर्शन घडवतं. भोंडेकर माझे भाऊ आहेत, ते काहीही बोलू शकतात. पण राजकारण समजत नाही, असं म्हणून चालणार नाही. मागील दहा वर्षांत जिल्ह्यात अनेक निर्णय असे आहेत जे माझ्या सल्ल्याशिवाय झाले नाही, हे भोंडेकर यांनाच विचारून बघा, असेही डॉ. फुके यांनी स्पष्ट केले.
राज्यात सुरू असलेल्या हिंदी – मराठी वादावर भाष्य करताना फुके यांनी ठाकरे बंधूंवर थेट प्रहार केला. मराठीचा ‘म’ म्हणजे महानगरपालिकेचा ‘म’ आहे का, हेच मला कळेनासं झालंय. निवडणूक आल्या की त्यांचं मराठी प्रेम उफाळून येतं, अशी घणाघातात्मक टीका त्यांनी केली. डॉ. फुके पुढे म्हणाले, माझा ठाकरे बंधूंना प्रश्न आहे. त्यांच्या मुलांनी कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलं? मराठी, हिंदी की इंग्रजी? दिवसभर इंग्रजी बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणूक आल्या की मराठीचा गजर करतात. ह्याला आपण ‘मराठी प्रेम’ म्हणायचं का? असा टोकदार सवाल फुके यांनी उपस्थित केला.
जरांगेंचा स्टंट
ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्यावरही त्यांनी मत व्यक्त करत म्हणाले, ‘दोन बंधू एकत्र आले तरी फारसा फरक पडेल, असं मला वाटत नाही.’ यावेळी मनोज जरांगे यांच्यावरही फुके यांनी भाष्य करत म्हटलं, निवडणूक आल्या की जरांगे बाहेर पडतात आणि नंतर पुन्हा बिळात जातात. मराठा आरक्षण हा त्यांचा केवळ राजकीय स्टंट आहे. त्यांना ना समाजाला न्याय द्यायचा आहे, ना आरक्षण मिळवून द्यायचं आहे. त्यांना फक्त सोशल मीडियावर फ्लॅशमध्ये राहायचं आहे.
डॉ. परिणय फुके पुढे म्हणाले, आज मराठा समाज जागरूक झाला आहे. त्यांना हे उमगलंय की, खरा निर्णय कुणाकडून मिळतो आणि फक्त भाषण कोण करतं. डॉ. परिणय फुके यांची ही स्पष्टोक्ती म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नव्हे, तर राजकारणात प्रामाणिकपणाच्या पायाभूत मूल्यांची जाणीव करून देणारा वास्तवदर्शी आरसा आहे. अफवांच्या कोलाहलातही ज्या नेत्याचा आवाज वस्तुस्थिती मांडतो, त्यालाच खरा ‘लोकप्रतिनिधी’ म्हणतात.
Monsoon Session : तोंडाचं बटण बंद नाही केलं तर खुर्चीचा प्लग खेचणारच