महाराष्ट्र

Parinay Fuke : धरणीचे हसू परत येणार

Maharashtra Legislative Council : तलावांच्या नवजीवनासाठी सरसावलेले परिणय फुके

Share:

Author

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तलाव गाळमुक्त होणार आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळून शेतीला मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या विकासावर महत्त्वपूर्ण चर्चा रंगली असताना, आमदार आणि माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जलसंधारणाच्या समस्येवर ठोस भूमिका मांडली. त्यांनी विधानपरिषदेत या भागातील 4 हजार 400 माजी मालगुजरी तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचा मुद्दा उपस्थित केला. या तलावांच्या गाळमुक्तीमुळे जलस्रोत पुनरुज्जीवित होऊन शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2019 दरम्यान राज्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यात आली होती. या योजनेंतर्गत अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या प्रकल्पांना चालना मिळाली होती. डॉ. फुके यांनी याच धर्तीवर गाळमुक्त धरण अभियानाचे महत्त्व पटवून दिले आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तलाव पुनरुज्जीवनासाठी सरकारला ठोस पावले उचलण्यास भाग पाडले.

Eknath Khadse : अधिवेशन गाजलं नाही, वाया गेलं

योजनेला मंजुरी 

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर सरकारने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 4 हजार 400 तलाव गाळमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विधानपरिषदेत हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आणि तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ या प्रस्तावाची दखल घेत संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, उपसचिव, अवर सचिव, मुख्य अभियंता आणि डॉ. फुके उपस्थित होते. बैठकीत 4 हजार 400 तलाव टप्प्याटप्प्याने गाळमुक्त करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय

भंडारा आणि गोंदिया जिल्हे मुख्यतः धान उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखले जातात. मात्र, पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीवर मोठा परिणाम होतो. पूर्वीच्या गोंड राजांनी या भागातील सिंचनक्षमतेसाठी 6 हजार 700 तलाव बांधले होते. 1950 मध्ये शासनाने हे तलाव ताब्यात घेऊन जिल्हा परिषद आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत दिले. मात्र, गाळ साचल्यामुळे पाणीसाठा कमी झाला आणि भूजल पातळीही मोठ्या प्रमाणावर खालावली.

डॉ. परिणय फुके यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. या तलावांच्या पुनरुज्जीवनामुळे शेतकऱ्यांना जलसंधारणाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे सिंचनाच्या सोयी सुधारतील आणि धान उत्पादनही वाढेल.

सामाजिक संस्थांचा सहभाग

गाळमुक्ती योजना ही फक्त सरकारपुरती मर्यादित न राहता, टाटा फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन यांसारख्या मोठ्या सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. येत्या 2 – 3 वर्षांत या तलावांमधील संपूर्ण गाळ हटवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे या भागातील जलस्रोत सुधारेल आणि शेतीसाठी आवश्यक पाणीसाठा निर्माण होईल. या निर्णयामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शाश्वत जलस्रोत निर्माण झाल्याने भविष्यात शेतीला पाण्याचा मोठा आधार मिळेल. डॉ. परिणय फुके यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे. त्यांचे योगदान या प्रकल्पाच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!