नागपूरच्या नाग नदी आणि वैनगंगा नदीच्या प्रदूषणाचा गंभीर मुद्दा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. जलप्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी त्यांनी केली.
उपराजधानी नागपुरातील नाग नदी आणि वैनगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. भंडारा-गोंदियाचे माजी पालकमंत्री आमदार डॉ. परिणय फुके सोमवार, 17 फेब्रुवारीचा दिवस चांगलाच गाजवला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी विधान परिषदेत आवाज बुलंद केला. नागपुरातील नाग नदी आणि वैनगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला. पूर्वीच्या काळापासून नद्यांच्या काठावर गावं वसली. नद्यांच्या काठावर संस्कृतीचा विकास झाला. पण कालांतरां नद्या प्रदूषित झाल्या. आता या नद्यांचा प्रवाह पुन्हा सुरळीत, स्वच्छ करण्यासाठी डॉ. फुके सरसावले आहेत.
नाग नदीमार्फत वैनगंगेत येणाऱ्या सांडपाण्यामुळे या नदीचे जलप्रदूषण अत्यंत गंभीर बनले आहे. सरकारने यासंदर्भात तातडीने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी आमदार डॉ. फुके यांनी विधान परिषदेत केली. संपूर्ण देशाची आकडेवारीही यावेळी डॉ. फुके यांनी सादर केली. देशभरात 351 प्रदूषित नद्या आहेत. त्यापैकी 53 नद्या केवळ महाराष्ट्रात आहेत. ही बाबच राज्यातील जलस्रोतांच्या आरोग्याची स्थिती दर्शवते. यापूर्वीच्या सरकारने नद्यांच्या स्वच्छतेकडे कोणतेही लक्ष दिले नाही, याबद्दल डॉ. फुके यांनी खेद व्यक्त केला.
समस्या वेळीच सुटावी
विदर्भातील वैनगंगा नदीला नाग नदीसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे जलप्रदूषण अधिक तीव्र होत आहे. डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत सांगितले की, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातून दररोज 520 एमएलडी सांडपाणी नाग नदीमार्फत वैनगंगा नदीत मिसळले जात आहे. यातील केवळ 300 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित पाणी शुद्ध न होता नदीत मिसळते. 2012 पासून प्रदूषण रोखण्याच्या योजना जाहीर केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात स्थिती बदललेली नाही.
नागपूर महानगरपालिका आणि एनआयटीने प्रदूषण नियंत्रणासाठी 500 कोटी रुपयांची बँक गॅरंटी दिली होती. मात्र एक दशक उलटूनही संपूर्ण ट्रिटमेंट प्रक्रिया पूर्णत्वास गेलेली नाही. परिणामी नाल्यांमधून आणखी अतिरिक्त 300 ते 400 एमएलडी सांडपाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका क्षेत्राबाहेरील गावांमधूनही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे.
स्वच्छता गरजेची
नागपूर परिसरातील विविध उद्योग क्षेत्र आहे. भंडाऱ्यातील डिफेन्स फॅक्टरी, एनटीपीसी, कोराडी आणि खापरखेडा थर्मल पॉवर प्लांट यांनी आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. परंतु, तरीही हे उद्योग प्रदूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडत असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या 5 मार्च 2020 परिपत्रकानुसार, थर्मल पॉवर प्लांट्सना ट्रीटेड वॉटरचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे, असे ते म्हणाले.
डॉ. परिणय फुके यांनी सरकारने वैनगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी कोणते उपाय आखले आहेत? असा प्रश्न विचारला. मागील तीन वर्षांत कोणते प्रकल्प हाती घेण्यात आले आणि त्यावर किती निधी खर्च झाला आहे, अशी विचारणाही त्यांनी केली. प्रदूषणास जबाबदार असलेल्या उद्योगांवर मागील पाच वर्षांत कोणती दंडात्मक कारवाई करण्यात आली, याचीही माहिती देखील आमदार डॉ. फुके यांनी मागितली.
नमामि गंगेसारखे काम व्हावं
‘नमामी गंगे’च्या धर्तीवर वैनगंगा पुनरूर्जीवनासाठी विशेष योजना राबवावी. केंद्र सरकारच्या ‘नमामि गंगे’ योजनेसारखी स्वतंत्र योजना महाराष्ट्रात लागू करावी. वैनगंगा नदी हे विदर्भाच्या जलस्रोतांचे जीवन आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी ही नदी शुद्ध आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी सरकारने तत्काळ उचलावी, अशी मागणी देखील माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली.