महाराष्ट्र

Parinay Fuke : सिनेमातील ड्रग्सची पावडर लाईन झाली तरुणाईसाठी डेंजरलाईन

Monsoon Session : भाजप आमदाराने केला विधान परिषदेत 'डिजिटल नशेचा' पर्दाफाश

Author

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुण पिढीत गंभीर विपरीत परिणाम दिसून येत आहे. या गंभीर परिस्थितीला लक्षात घेऊन भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत हा मुद्दा लक्षवेधीपणे मांडला आहे.

राज्यात सध्या पावसाळी अधिवेशनाचे वारे वाहू लागले आहेत. अश्यातच सभागृहामध्ये एक गंभीर आवाज दुमदुमला. हा आवाज होता भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचा. त्यांनी सभागृहात थेट ‘ड्रग्सचा बॉम्ब’ फोडत राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या विळख्यावर अत्यंत तीव्र आणि स्पष्ट भूमिका मांडली. गावपातळीपासून ते शहरी भागांपर्यंत ड्रग्स, एमडी आणि इतर अंमली  पदार्थांचा सुळसुळाट सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या व्यसनाधीनतेच्या साखळीत अल्पवयीन मुले आणि तरुणांचा समावेश होतो आहे, ही बाब अधिक धोकादायक ठरतेय.

डॉ. फुके यांनी अधिवेशनात स्फोटक उदाहरणांसह उपस्थित केलेल्या मुद्द्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, अमली पदार्थांचं मूळ केवळ गुप्त विक्रेत्यांत नाही, तर मीडिया, सिनेमा आणि सोशल मीडियात वाढत असलेल्या ‘ग्लोरीफिकेशन’ मध्येही आहे. वेब सिरीज आणि काही चित्रपटांमध्ये ड्रग्स घेण्याच्या कृतीचं खुलेआम उदात्तीकरण केलं जातं. ‘हिरो ड्रग घेतो, मग त्याला जास्त एनर्जी मिळते, हे दाखवण्यामागे नेमकं काय उद्दिष्ट आहे? असा थेट सवाल डॉ. फुके यांनी उपस्थित केला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनावर याचा विपरीत परिणाम होतो आहे. ते पुढे म्हणाले, की शाळा आणि कॉलेजांमध्ये पोलिसांच्या साह्याने जनजागृती केली जाते.

Parinay Fuke : चंद्रपूरच्या ग्रामविकासात पदोन्नतीची गाडी थांबली

पोलिसांची मेहनत अपुरी

परंतु आजची ही पिढी चांगलं शिकवून शिकत नाही, मात्र वाईट गोष्टी लगेच आत्मसात करते. सभागृहात बोलताना डॉ. फुके म्हणाले, ‘मी ५० हून अधिक अशा चित्रपटांची उदाहरणं देऊ शकतो, ज्यात ड्रग्सचं उदात्तीकरण केले गेले आहे. काही सिनेमांमध्ये तर ड्रग्स घेण्याची पद्धत, ‘लाईन’ कशा आखायच्या हेही दाखवलं जातं. ज्याच्या तरुणांवर उलट परिणाम होतो. शाळेतील चिमुकल्यांनादेखील टाल्कम पावडर वापरून ड्रग्ससारखं दृश्य कसं निर्माण करायचं हे त्यांना चांगलं कळत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यांनी अभिव्यक्त स्वातंत्र्याच्या नावाखाली या प्रकारांना दिला जाणारा मोकळा वाव थांबवण्याची मागणी केली.

ड्रग्सचे सेवन केल्यानंतर कलाकारांमध्ये ऊर्जा येते हा आजकालच्या विद्यार्थ्यांचा चर्चेचा विषय आहे.  अशा चर्चा जर युवा वर्गात होत असतील, तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी सरकारपुढे ठामपणे उभा केला. इंस्टाग्राम, रील्स, सिनेमे, वेब सिरीज या सगळ्या माध्यमांवर जर अंकुश नसेल, तर पोलिसांची मेहनतही अपुरी ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. वेब सिरीज असो वा सिनेमा अमली पदार्थांचे दृश्य, त्याचे ग्लोरीफिकेशन आणि हे सर्व सामान्य करण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे. हे केवळ मनोरंजन नाही हे भविष्यातील पिढ्यांवर घातक परिणाम करणारी विषारी संस्कृती आहे, अशी घणाघाती टीका करत डॉ. फुके यांनी राज्य सरकारकडे ठोस उपायांची मागणी केली.

Parinay Fuke : शेतकऱ्यांचा मुद्दा उराशी घेऊन आमदार पोहोचले परिषदेच्या दारी

सभागृहातील या स्फोटक भाषणानंतर, ड्रग्सच्या वाढत्या प्रभावावर केवळ कायदेशीर नव्हे, तर सांस्कृतिक आणि मनोरंजन माध्यमांतील प्रचारावरही अंकुश आणण्याची गरज भासली आहे. हा मुद्दा फक्त पोलिसांची कारवाई किंवा जनजागृतीपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाने गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. त्याची सुरुवात विधान परिषदेत डॉ. फुके यांच्या बुलंद आवाजाने झाली आहे.

Parinay Fuke : सरकारी नियमांच्या जाळ्यात अडकलेला संघर्ष अखेर यशस्वी

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!