
महाराष्ट्रातील शालार्थ शिक्षक भरती प्रक्रियेत बनावट शिक्षकांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. यावरून भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले आहे.
राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर मोठा धक्का बसवणारा शालार्थ घोटाळा समोर आला आहे. शाळांमध्ये ज्ञानदानासाठी नेमले गेलेले शिक्षक हे खरे शिक्षकच नव्हते, ही गोष्ट ऐकून सर्वत्र खळबळ उडाली आहे. 2019 ते 2025 सहा वर्षांच्या काळात तब्बल 1 हजार 56 बनावट शिक्षक राज्यातील विविध शाळांमध्ये रुजू झाल्याचे गंभीर वास्तव उघड झाले आहे. हे शिक्षक बोगस शालार्थ आयडी वापरून शाळांमध्ये रुजू झाले आणि हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ मांडला. या घोटाळ्याची साखळी इतकी गुंतागुंतीची होती की त्यात बनावट कागदपत्रांची निर्मिती, नकली शिक्षकांचे वेतन व त्यातून घेतले जाणारे कमिशन या सगळ्याचा काळा व्यवहार एकत्रितपणे चालू होता. ही बाब आता पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी यावर विधान परिषदेत जोरदार आवाज उठवला आहे. डॉ. परिणय फुके यांनी या घोटाळ्याला नागपूर पुरता सीमित न ठेवता त्याचा संपूर्ण राज्यभरात विस्तार झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा फक्त शिक्षक भरतीचा गैरप्रकार नाही. हा घोटाळा थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेला आहे. डॉ. फुके यांच्या मते, कोणताही सचिव किंवा उच्चपदस्थ अधिकारी सामील नसता, तर इतका मोठा घोटाळा अशक्य होता. या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असले, तरी कोणत्याही अधिकाऱ्यावर अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही. अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं नाही.

भ्रष्टाचारावर कडक नजर
डॉ. फुके यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत विचारले की, हे गुन्हे (IPC 420, 465, 468, 472, 409, 120) दाखल करूनही संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेले नाही. या अधिकाऱ्यांची चौकशी त्यांच्या खालील विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. डॉ. फुके यांनी यावर आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला की, दर अधिवेशनात एखादा नवीन स्कॅम उघडकीस येतो. त्यावर SIT बसवली जाते, रिपोर्टही येतो. पण त्यानंतर त्या प्रकरणाचं काय होतं? कोणालाच माहिती नसते. त्यांच्या मते, घोटाळ्याचे नावे अधिवेशनात गाजतात, पण काही वर्षांनी तेच अधिकारी बेलवर सुटतात आणि निवृत्तीनंतर सन्मानाने जीवन जगतात.
डॉ. परिणय फुके यांनी पाच वर्षांपूर्वी उघड झालेल्या नागपूरमधील स्कॉलरशिप घोटाळ्याचीही आठवण करून दिली. त्यातही SIT नेमण्यात आली होती. रिपोर्टही आला होता. पण त्यानंतर पुढे काहीच घडलं नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या संपूर्ण प्रकरणात जर खरे दोषी सापडायचे असतील तर चौकशी ADG किंवा ACS रँकच्या वरिष्ठ IPS किंवा IAS अधिकाऱ्यांकडून व्हावी, अशी स्पष्ट मागणी डॉ. फुके यांनी विधान परिषदेत केली. मंत्रालयात ज्या अधिकार्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत का? असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.एकंदरीत, शालार्थ घोटाळ्याच्या निमित्ताने डॉ. परिणय फुके यांनी शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा चेहरा विधिमंडळात उघड करून ठेवला आहे. फक्त शिक्षकच नाहीत, तर संपूर्ण व्यवस्था या बनावटपणाने ग्रासलेली असल्याचं ते म्हणाले. आता या आवाजावर सरकार किती गांभीर्याने पावले उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Parinay Fuke : सिनेमातील ड्रग्सची पावडर लाईन झाली तरुणाईसाठी डेंजरलाईन