फुले चित्रपट काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. यावर आता यांनी सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा असल्याचे सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात फुले हे नाव वारंवार चर्चेत आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट केवळ एक बायोपिक नाही, तर सामाजिक क्रांतीचे प्रतिबिंब म्हणता येईल.चित्रपटाची मूळ प्रदर्शिती तारीख 11 एप्रिल, महात्मा फुले यांची जयंती, अशी ठरवण्यात आली होती. मात्र, काही संघटनांनी, विशेषतः ब्राह्मण महासंघाने यावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटाची प्रदर्शिती पुढे ढकलण्यात आली. आता ही कलाकृती 25 एप्रिल रोजी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटावर राजकीय प्रतिसादही उमटायला सुरुवात झाली आहे. यातच न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपली भूमिका मांडली आहे.
देशभरातील आणि परदेशातील चित्रपटगृहात एकाच वेळी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुलेंची भूमिका साकारतोय. तर अभिनेत्री पत्रलेखा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधात नाही असं रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फुले हा सिनेमा सामाजिक परिवर्तन घडवणारा आहे. जोतिबा फुलेंचं कार्य हे केवळ ऐतिहासिक नव्हे, तर क्रांतिकारी आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. महात्मा फुलेंनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून समाजाला जागं केलं.
आंबेडकरी विचारांचा संदर्भ
अस्पृश्यता, जातीभेद विरोधात त्यांनी लढा दिला. स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला. त्यांच्या जीवनावरचा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा, असे आवाहनही त्यांनी केलं.
रामदास आठवले यांनी हेही स्पष्ट केलं की, हा चित्रपट कोणत्याही जाती-धर्माविरोधात नाही. ट्रेलर पाहून गैरसमज करून घेऊ नये. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच त्याचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन करता येईल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत सांगितलं की, इतिहास जे विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळे फुले हा चित्रपट केवळ दलित-शोषित वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न करत नाही.
संपूर्ण समाजाला या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन हे स्वतः ब्राह्मण समाजातून आलेले आहेत. त्यामुळे काही संघटनांनी केलेला विरोध निरर्थक आहे, हे त्यांनी ठामपणे मांडलं. भिडेवाडा जिथे फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ती जागा भिडे नावाच्या ब्राह्मणाने दिली होती. त्यामुळे फुलेंच्या कार्याला काही ब्राह्मणांनीही पाठिंबा दिला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. फुले हा चित्रपट यु सर्टिफिकेटसह सेन्सॉर बोर्डाकडून पास झाला आहे. 25 एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण देशात आणि परदेशातही एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. तो पाहून इतिहासाची खरी ओळख मिळवणं, हे आजच्या पिढीसाठी गरजेचं आहे.
