प्रशासन

Gondia : विद्येच्या मंदिरात विजेमुळे काळोख

Powerless Paper : गोंदिया जिल्ह्यातील शाळांना महावितरणचा फटका

Author

गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलांमुळे शाळांचा वीज पुरवठा परीक्षेच्या काळात खंडित झाला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेत परीक्षा देणे कठीण झाले आहे.

उन्हाच्या कडाक्यात ज्या वेळेस विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या गारव्याची सर्वाधिक गरज आहे, त्या वेळेसच विद्युत विभागाने वीज पुरवठा खंडित केला आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये अक्षरशः अंधार पसरला आहे. आधीच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा उशिराने सुरु झाली आहे. यामुळे पालकांसोबत विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. त्यातच परीक्षा सुरू असताना, गोंदिया जिल्ह्यातील 69 जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीज पुरवठा थकीत बिलामुळे खंडित करण्यात आला आहे. याचा थेट फटका सुमारे 2 हजार 334 विद्यार्थ्यांवर बसला आहे.

प्रचंड उष्णतेमध्ये परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी आधीच एक आव्हान आहे. त्यातच शाळांमधील पंखे बंद, लाईट नाही. डिजिटल शिक्षणाची साधनेही कोलमडल्यामुळे मुलांना परीक्षेसाठी अत्यंत त्रासदायक स्थितीचा सामना करावा लागत आहे. काही शाळांमध्ये परीक्षा वर्गांऐवजी उघड्या गॅलऱ्यांमध्ये घेतली जात आहे. तिथे उन्हाचा कहर अधिक जाणवतो आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांवर सध्या एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. यावर महावितरणने तात्काळ कारवाई करत शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

Harshwardhan Sapkal : महायुतीने मोदींकडून पॅकेज आणून राज्य वाचवावे

ग्रामपंचायतींचं दुर्लक्ष

विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना बिल भरण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थी भर उन्हात अंधारात बसून परीक्षा देत आहेत. या परिस्थितीमुळे पालकांमध्येही चिंता वाढली आहे. आधीच उन्हामुळे मुले हैराण आहेत, त्यात वीज नसल्यानं त्यांचं लक्ष अभ्यासात लागणार तरी कसं? असा प्रश्न अनेक पालक विचारत आहेत. काही शाळांमध्ये शुद्ध पाणीपुरवठाही वीजेवर अवलंबून असल्याने पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे.

5 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान एकत्रितपणे परीक्षा घेतल्या जात आहेत. यामुळे मुलांना प्रत्येक दिवशी शाळेत उपस्थित राहावे लागत आहे. मात्र वीज नसल्यामुळे शिक्षकांनाही मूल्यमापन प्रक्रियेसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण यावर्षी निकाल 1 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल तयार करण्यासाठी तातडीने काम करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुगम व्हावा यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या असल्या, तरी अशा घटनांमुळे त्या योजनेचे शॉर्ट सर्किट होते आहे.

Vidarbha : ग्रामपंचायत अधिकारी आता राज्यस्तरीय सन्मानाचे मानकरी

सध्या परिस्थिती अशी आहे की, एकीकडे विद्यार्थ्यांच्या हातात परीक्षेचा पेपर आहे. दुसरीकडे मात्र वर्गखोल्यांमध्ये अंधार व उष्णतेचा कहर. शिक्षणाच्या मंदिरात जेव्हा दिवेच नसतील, तेव्हा तिथे ज्ञानाचा प्रकाश कसा पसरावा? शासन आणि स्थानिक प्रशासनाने याची तात्काळ दखल घेणे अत्यावश्यक आहे, कारण शिक्षणावर अंधार पडला तर समाजाच्या भविष्यावरच सावट येईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!