अकोट येथे अवाजवी मालमत्ता कराच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने थेट नगरपरिषदेवर हल्लाबोल करत गदारोळ घातला. संतप्त नागरिकांच्या आवाजाला दिशा देत प्रहारने प्रशासनाच्या मनमानी निर्णयांचा तीव्र निषेध नोंदवला.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आता नागरी समस्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. अकोटमध्ये प्रहार पक्षाने अवाजवी मालमत्ता कराच्या विरोधात थेट नगर परिषदेवर मोर्चा काढत आपली लढाऊ भूमिका पुन्हा अधोरेखित केली. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी संतप्त घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता आणि प्रशासनाला प्रतीकात्मक पद्धतीने इशारा देण्यात आला.
अवाजवी मालमत्ता करामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोट नगर परिषदेवर जोरदार आंदोलन करण्यात आले. नागरिकांमध्ये या कराविषयी तीव्र असंतोष आहे. जवळपास सर्वच मालमत्ता धारकांनी या कराच्या विरोधात हरकती दाखल केल्या आहेत. या असंतोषाचा आवाज बनून प्रहारने आंदोलकांची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली.
तणावपूर्ण वातावरण
या आंदोलनात विशेष लक्ष वेधले गेले ते म्हणजे नगर परिषदेच्या इमारतीवर खुर्ची लटकवण्याचा प्रतीकात्मक प्रकार. या कृतीने सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारावर टीका करण्यात आली. हे दृश्य पाहण्यासाठी आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने नगर परिषद परिसरात जमले होते. यामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. मात्र, शहर पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच प्रवेश न देता काही निवडक प्रतिनिधींना निवेदन सादर करण्याची संधी देण्यात आली. या निवेदनात अनेक ठोस आणि तर्कसंगत मागण्या मांडण्यात आल्या. अवाजवी कर तत्काळ मागे घ्यावा, कराची रचना ही भाडे मूल्य आधारित असावी. झोन 1 व 2 मध्ये चुकीने दाखल झालेल्या मालमत्तांचा फेरविचार करावा, हरकती न अटींशिवाय स्वीकाराव्यात आणि झोपडपट्टी व दलित वस्त्यांवरील कर कमी करावा. तसेच अकोट शहरावर महानगरांसारखे दर लावणे अन्यायकारक असल्याचेही नमूद करण्यात आले.
Yashomati Thakur : न्यायव्यवस्थेलाच नियंत्रित करण्याचा भाजपच्या अजेंडा
आक्रमक भूमिका
आंदोलनात प्रहार युवा जिल्हाध्यक्ष सुशील पुंडकर, जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, संजय गवारगुरु, ज्ञानेश्वर दहिभात, गणेश गावंडे, अवि घायसुंदर, जिवन खवले, विशाल भगत, अचल बेलसर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. या आंदोलनाद्वारे त्यांनी प्रशासनावर स्पष्ट दबाव निर्माण केला आणि जनतेच्या असंतोषाला एका संयमित पण ठाम आवाजात व्यक्त केले.
राज्याच्या ग्रामीण भागांतील शेतकरी प्रश्नांप्रमाणेच आता प्रहार पक्ष शहरी नागरीकांच्या आर्थिक अडचणींनाही वाचा फोडताना दिसतोय. अकोटमधील हे आंदोलन फक्त एकदिवसीय निदर्शने नव्हते, तर संपूर्ण शहराच्या असंतोषाला संघटित पद्धतीने सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न होता. या आंदोलनातून प्रशासनाला इशारा देत सुशील पुंडकर यांनी स्पष्ट केलं की, हे फक्त सुरूवात आहे. जर प्रशासनाने जनतेच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, तर प्रहार अधिक तीव्र आंदोलन छेडणार.
अकोटमध्ये झालेलं हे आंदोलन केवळ कर विरोधाचं नव्हतं, तर ते प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकतेविरोधातील एक सशक्त जनआंदोलन ठरलं. ‘प्रहार’ने या आंदोलनातून पुन्हा एकदा सिद्ध केलं की, जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्षाची वाट सोडलेली नाही, आणि हे आंदोलन म्हणजे शहरातील शांततेवरून उसळलेली जनआक्रोशाची ज्वाळा होती.