संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक आणि हल्ला केला.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरात शनिवारी (१३ जुलै) एक धक्कादायक घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि पुरोगामी विचारवंत प्रवीण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकून मारहाण करण्यात आली. फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाज यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या गायकवाड यांच्यावर अचानक काही लोकांनी हल्ला केला. त्यांच्या गाडीसमोर येत आक्रमकपणे काळी शाई फेकण्यात आली आणि गाडीतून जबरदस्तीने खाली ओढत त्यांच्यावर मारहाण करण्यात आली. या हल्ल्याने राज्यभरात खळबळ उडाली असून, आरोपी हे भाजपशी संबंधित ‘शिवधर्म फाउंडेशन’शी संलग्न असल्याचा आरोप आहे.
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दीपक काटे (भाजप युवा मोर्चा राज्य सचिव), किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, हा केवळ एखाद्या व्यक्तीवरचा हल्ला नाही, हा भाजपच्या द्वेषमूलक प्रवृत्तीचा पगडा आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला भ्याड हल्ला म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे. पटोले यांनी राज्य सरकारवर थेट आरोप करत म्हटले की, आता पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणे धोक्याचे ठरत आहे.
Sanjay Khodke : कृषी क्षेत्राच्या नवसंजीवनीसाठी आमदारांचा व्हिजन प्लान
सार्वजनिक हिंसावर निषेध
सत्तेचा वापर करून सामाजिक संघटनांच्या तोंडाला पट्टी बांधायची ही नीती अंगलट येईल. त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि सांगितले की, गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस म्हणाले की, ज्या लोकांनी हल्ला केला ते गायकवाड यांच्या संभाजी या नावावर आक्षेप घेत होते. छत्रपती संभाजी का नाही? असा वाद निर्माण करत शाईफेक केली गेली. त्यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
गायकवाड यांनी तक्रार नोंदवण्यास सुरुवातीला नकार दिला, तरी पोलीसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर सोशल मीडियावरून आणि विविध विचारवंतांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. एका विचारप्रवाहावर नोंद घेतल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात अशा प्रकारची हिंसा घडणे हे गंभीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील मतभेद आणि राजकीय कटुता वाढताना दिसते. विचारांवर आधारित संघर्ष व संवाद हा लोकशाहीचा भाग असला, तरी हिंसक मार्गाने त्याची सोडवणूक करण्याची ही प्रवृत्ती धोकादायक आहे.