महाराष्ट्र

Ujjwal Nikam : फोन येताच पंतप्रधान म्हणाले, हिंदी बोलू की मराठी ?

Rajya Sabha : कसाबच्या फाशीपासून दिल्लीच्या खुर्चीपर्यंत

Author

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट फोन करून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्यात येत असल्याची माहिती दिली. मराठीतून सुरू झालेल्या या सन्मानपूर्वक संवादानंतर निकम यांचा संसदेपर्यंतचा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरला आहे.

दिल्लीच्या राजकारणाच्या व्यासपीठावर आता एक नवीन आणि तेजस्वी चेहरा झळकणार आहे. ते म्हणजे ज्येष्ठ सरकारी वकील आणि देशातील खटल्यांचा ‘शिल्पकार’ ठरलेले अ‍ॅड. उज्ज्वल निकम. भारतीय संसदेमधील वरीष्ठ सभागृहात, म्हणजेच राज्यसभेत आता निकम यांचा बुलंद आवाज ऐकू येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली असून, ही नियुक्ती म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेच्या यशाचा संसदीय सन्मानच म्हणावा लागेल.

या ऐतिहासिक क्षणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून निकम यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला. विशेष म्हणजे, मोदींनी फोनवर बोलताना सुरुवातच मराठीतून करत, मी मराठीत बोलू का हिंदीत? असा आदरयुक्त प्रश्न विचारला. यावर निकम यांनी नम्रतेने उत्तर दिलं की, आपल्याला दोन्ही भाषा उत्तम जमतात. यानंतर पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेतूनच सुसंवाद साधत सांगितले की, राष्ट्रपती महोदयांनी तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वप्नातही वाटलं नव्हतं

या संवादाचा उल्लेख करताना उज्ज्वल निकम यांनी आपल्या भावना अशा शब्दांत व्यक्त केल्या की, ही घटना इतक्या लवकर घडेल, हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण हे खूप जलद घडलं. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थातच राष्ट्रपती महोदया यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद आहे. मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे, असे निकम म्हणाले.

उज्ज्वल निकम हे नाव म्हणजे भारताच्या न्यायालयीन इतिहासात एक सळसळता मंत्र. अजमल कसाबच्या फाशीपर्यंतचा प्रवास असो की 1993 बॉम्बस्फोट, मनोहर जोशींचा गुन्हेगारी खटला, किंवा डेव्हिड हेडलीची साक्ष, प्रत्येक प्रकरणात निकम हे न्यायव्यवस्थेचे धारदार शस्त्र ठरले. त्यांनी जनतेच्या सुरक्षेसाठी, निर्भीडपणे गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली आहे. आणि आता तीच ऊर्जा, तोच अनुभव आणि तीच निष्ठा ते संसदेमध्ये न्यायनीतीच्या मुद्द्यांना देणार आहेत.

Lohit Matani : एसी मधून नाही, आता मैदानात उतरून लावणार ट्राफिकला शिस्त 

न्यायभूमिकेतील सहकारी 

निकम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, ही माझ्यावर आलेली जबाबदारी फक्त संसद सदस्यतेपुरती मर्यादित नाही. ही लोकशाहीवरची, जनतेच्या न्यायावरील विश्वासावरची जबाबदारी आहे. मी माझं सर्व आयुष्य न्यायसंवेदनशीलतेला वाहिलं आहे. संसदेतही तोच आवाज बुलंदपणे उठवण्याचा मी प्रयत्न करीन.

निकम यांनी डेव्हिड हेडली याची साक्ष घेतली, त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली सहकार्याची आठवण खास करून सांगितली. त्या काळात या दोघांनी दिलेलं पाठबळ मी विसरू शकत नाही. या दोघांचंही योगदान मी माझ्या यशात मानतो, असं सांगताना निकम यांच्या आवाजात कृतज्ञतेची छाया होती.

संविधानिक गौरव

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ८०(३) अंतर्गत, राष्ट्रपती १२ व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित करू शकतात. हे सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि न्यायव्यवस्था यांसारख्या क्षेत्रांतील प्राविण्यासाठी ओळखले जातात. यंदा उज्ज्वल निकम यांच्यासोबत, केरळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांचीही निवड झाली आहे.

अशा व्यक्तींचा संसदेत प्रवेश म्हणजे केवळ गौरव नव्हे, तर भारतातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरतं. निकम यांचे न्यायासाठीचे लढे, त्यांचा प्रामाणिकपणा, आणि देशाच्या सुरक्षेसाठी केलेली धडपड, हे सगळं आता संसदेत नवनवीन मुद्द्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वापरलं जाणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!