अकोला महानगरपालिकेने 2025-26 साठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला असून कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात 42 ई-बस, रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा आणि दिव्यांग भवनासह विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
अकोला महानगरपालिकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी एक हजार 456 कोटींच्या संकल्पित अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत हा मंजूर करण्यात आला. प्रशासकांच्या कार्यकाळातील हे सलग तिसरे अंदाजपत्रक आहे. त्यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ न करता समतोल अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
सदर अर्थसंकल्पानुसार, महापालिकेचे एकूण उत्पन्न एक हजार 456 कोटी 83 लाख तर संभाव्य खर्च एक हजार 445 कोटी 91 लाख राहणार आहे. अंदाजपत्रकात 10 कोटी 92 लाख रुपयांची शिल्लक दर्शवण्यात आली आहे. महसुली उत्पन्नासाठी 335 कोटी 26 लाख, भांडवली अनुदान व मालमत्तेच्या उत्पन्नासाठी 863 कोटी 30 लाख. असाधारण ऋण व निलंबन लेखे अंतर्गत 181 कोटी 95 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोट्यवधींची तरतूद
महानगरपालिकेच्या खर्चाच्या बाबतीत, महसुली खर्च 322 कोटी 69 लाख, महापालिका निधीतून आणि शासन अनुदानातून भांडवली खर्च 935 कोटी 80 लाख तर असाधारण ऋण व निलंबन लेखे अंतर्गत 187 कोटी 42 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंदाजपत्रकात पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट करण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून 42 वातानुकूलित ई-बस उपलब्ध होणार आहेत. या बस सेवेसाठी खडकी दक्षिण झोनमध्ये बसस्थानक उभारणीसाठी दहा कोटींची तरतूद केली आहे. या बससेवेसाठी चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी दोन कोटी 50 लाख, मनुष्यबळ पुरवण्यासाठी चार कोटी तर बससेवा तूट भरून काढण्यासाठी सात कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
विकास योजना
महानगरपालिकेच्या विविध विकास योजनांना गती देण्यासाठी या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांसाठी “दिव्यांग भवन” उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय, रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थापन आणि मालमत्ता कर संकलन व्यवस्थेचा विस्तार करण्यावरही भर देण्यात आला आहे.
Narendra Modi : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर संघ आणि दीक्षाभूमीला भेट
महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात झालेल्या या अर्थसंकल्पीय सभेला महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने, मुख्य लेखा अधिकारी जगदीश मानमोठे, मुख्य लेखा परीक्षक वैजनाथ शेळके, उपायुक्त गीता ठाकरे, शहर अभियंता नीला वंजारी, कार्यकारी अभियंता अजय गुजर, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, सहायक आयुक्त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव तसेच शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन अनिल बिडवे यांनी केले.
आर्थिक नियोजन
महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून, मालमत्तांवरील उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. महसूल वाढवण्यासाठी नवे स्रोत शोधण्यात येतील आणि आर्थिक शिस्त कायम ठेवण्यात येईल. विशेष म्हणजे, या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सांगितले की, महापालिकेच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये योग्य समतोल राखत शहरातील गरजेच्या सेवांसाठी प्राधान्याने निधी खर्च केला जाईल. या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून अकोला शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल आणि नागरी सुविधा अधिक चांगल्या होतील. करसवलत कायम ठेवत विविध महत्त्वाचे प्रकल्प राबविण्याचा निर्णय नागरिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
