राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील 20 वर्षांनंतर ऐतिहासिक एकत्र येण्यानंतर मनसेने मराठी अस्मितेला प्राधान्य देत महापालिका निवडणुकीसाठी तयारी जोरात सुरू केली आहे.
राज्याच्या राजकीय पटावर गेल्या अनेक महिन्यांपासून गाजणारा मराठी भाषेचा मुद्दा आता अधिक गडद होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर 5 जुलै 2025 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरला. कारण अनेक वर्षांच्या अंतरानंतर ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याचा संकेत दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या संवादामुळे मराठी जनतेमध्ये नवचैतन्य संचारले आहे. मनसेचा पक्ष मेळावा नुकताच पार पडला. ज्यामध्ये राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक नवा कानमंत्र दिला. महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने प्रत्येक पक्ष कंबर कसून तयार आहे.
मनसेही या लढाईत आपला हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज ठाकरे यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले, २० वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? यामुळे मेळाव्यात उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युतीबाबत अजून थोडी प्रतीक्षा करण्याची सूचना त्यांनी केली. पण योग्य वेळ आल्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. तसेच, युतीचे काय करायचे, ते माझ्यावर सोडा. पण तुम्ही आपापसातील मतभेद मिटवा आणि एकत्र कामाला लागा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
Sanjay Khodke : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आमदारांची तरुणांसाठी मोटिवेशनल क्लास
नव्या युतीचा अंदाज
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मराठीचा मुद्दा जनतेच्या मनात खोलवर रुजवण्याचे आणि त्याचवेळी हिंदी भाषिकांबद्दल कोणताही द्वेष न ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत १०० टक्के मनसे सत्तेत येणार असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे पुन्हा एकदा तयारीला लागली आहे. मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवा ही त्यांच्या रणनीतीची मूळ दिशा आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सूचना दिल्या की, प्रचार मोहिमेत आत्मविश्वास आणि संयम यांचा योग्य समतोल ठेवा.
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचना फक्त निवडणूक तयारीपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी आहेत. राज ठाकरे यांनी युतीबाबत काही स्पष्ट विधान केले नाही. पण कार्यकर्त्यांनी एकमेकांना सन्मान द्यावा, हे त्यांनी ठामपणे बजावले, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होतोय. या अध्यायात मनसे पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी सज्ज होत आहे. मराठी भाषेच्या मुद्द्याला सशक्तपणे पुन्हा उजाळा देत, ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा संकेत दिल्यामुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत हा संदेश किती परिणामकारक ठरेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या नेतृत्वात पश्चिम विदर्भाला ऐतिहासिक भेट