
नागपूर विद्यापीठाला संशोधनासाठी एएनआरएफ-पेअर कार्यक्रमांतर्गत सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून विद्यापीठात विविध आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्प राबवले जाणार आहेत.
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रगत राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनच्या (एएनआरएफ) पेअर कार्यक्रमांतर्गत एक महत्त्वाचे यश मिळविले आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाला तब्बल सहा कोटी रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून विद्यापीठ विविध आंतरविद्याशाखीय प्रकल्प राबवणार आहे.
प्रकल्पाची ही भागीदारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंदौरच्या सहकार्याने घडवून आणण्यात आली आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या पाठबळाने विद्यापीठ संशोधनाच्या प्रगत वाटेवर वाटचाल करत आहे.

Chandrashekhar Bawankule : सीमेपलीकडील हल्ल्यांना आता जबरदस्त प्रत्युत्तर
विभागांचा सहभाग
निधीच्या माध्यमातून औषधी निर्माणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग या विभागांतील एकूण दहा संशोधन प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. आधुनिक साहित्य निर्माण, शाश्वत पर्यावरण विकास आणि ऊर्जा तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर या प्रकल्पांद्वारे कार्य होणार आहे. उपक्रमामुळे नागपूर विद्यापीठाची केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम होणार आहे. स्पोक संस्थेच्या भूमिकेतून विद्यापीठाने संशोधन सहकार्याचा आदर्श घालून दिला आहे.
तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी विद्यापीठातील संशोधकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेतली. विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संशोधकांचा हा सहभाग अत्यंत मोलाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमादरम्यान प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, प्रभारी आयआयएल संचालक डॉ. निशिकांत राऊत, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, प्रकल्प समन्वयक डॉ. दादासाहेब कोकरे यांच्यासह प्रमुख संशोधक डॉ. रिता वडेतवार, डॉ. विणा बेलगमवार, डॉ. रुपेश बडेरे, डॉ. विजय तांगडे, डॉ. उमेश पलीकुंडवार, डॉ. प्रकाश ईटनकर, डॉ. प्रवीण जूगादे, डॉ. दयानंद गोगले, डॉ. प्रमोद साळवे आणि डॉ. राजेश उगले उपस्थित होते.
Prashant Padole : शिक्षक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
भक्कम पाऊल
संशोधन निधीमुळे केवळ संशोधनासाठी आर्थिक बळच मिळाले नाही. तर नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधन क्षमतेवरही शिक्कामोर्तब झाले आहे. अशा प्रकल्पांमुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना आधुनिक संशोधनाची दारे उघडली जात आहे. विद्यानगरी नागपूरचा शैक्षणिक वारसा अधिक सशक्त होणार आहे. हा निधी म्हणजे विद्यापीठाच्या दूरदृष्टीचा, संघटन क्षमतेचा आणि संशोधनक्षमतेचा पुरस्कार आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या नेतृत्वाखाली आणि संशोधकांच्या एकत्रित प्रयत्नांतून मिळालेले हे यश इतर शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.