महाराष्ट्र

BJP State President : बावनकुळे यांची मशाल, चव्हाण यांच्या हाती

Maharashtra : प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर नवं नेतृत्व

Share:

Author

भाजपच्या महाराष्ट्र संघटनेत मोठा शिखरबदल होण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत. रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.

भाजपमधील नेतृत्वबदलाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनेच्या शिखरस्थानी नवा चेहरा विराजमान होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी डोंबिवलीचे आमदार, माजी मंत्री आणि मजबूत संघटन कौशल्य असलेले रवींद्र चव्हाण यांची निवड निश्चित मानली जात आहे. यासाठी त्यांनी आपला अर्ज थेट केंद्रीय निरीक्षक किरण रिजिजू यांच्याकडे सादर केला आहे. राज्यातील संपूर्ण भाजप नेतृत्वाच्या उपस्थितीत ही औपचारिकता पार पडली. 1 जुलैच्या संध्याकाळी या नव्या नेतृत्वाच्या घोषणेची अधिकृत मुहूर्तमेढ ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाच्या क्षणी चव्हाण यांची भरभरून प्रशंसा करत त्यांचा कार्यकर्त्यापासून ते प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास मांडला. “रवींद्र चव्हाण यांनी युवक मोर्चात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. नगरसेवक, आमदार, मंत्री होताना त्यांनी संघटनेचं भक्कम बांधकाम केलं आहे. त्यांच्या नावाचा अर्ज आम्ही केंद्राकडे सुपूर्त केला आहे, असे सांगत फडणवीसांनी चव्हाण यांच्या नेतृत्व क्षमतेवर ठाम विश्वास व्यक्त केला. 2022 मध्ये रवींद्र चव्हाण यांना प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांशी थेट संवाद साधण्याची त्यांची शैली पक्षाच्या नव्या रणनीतीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जात आहे.

Anil Deshmukh : महिलांवरील अत्याचारांविरुद्ध ‘शक्ती’ का झाली शक्तीहीन?

यशस्वी परिवर्तन

सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट 2022 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली होती. ओबीसी समाजाचे प्रभावी नेतृत्व करत त्यांनी संघटनेला बूथस्तरापर्यंत मजबूत केलं. त्यांच्या काळात 1.5 कोटी नवीन प्राथमिक सदस्य व 5 लाख सक्रिय कार्यकर्ते तयार करण्यात आले. भाजपच्या संघटनात्मक निवडणूक नियुक्त्या व बूथ मॅनेजमेंटचे प्रभावी नियोजन यामुळेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तब्बल 132 जागा जिंकत मोठं यश मिळवलं. लोकसभा निवडणुकीतील अपेक्षेपेक्षा कमी यशाच्या पार्श्वभूमीवरही बावनकुळे यांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करत विधानसभा लढतीत संघटन कौशल्य दाखवलं आणि भाजपला पुनः स्थिरपणे उभं केलं.

एक धडाडीचा संघटक

डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले रवींद्र चव्हाण हे 2009 पासून सलग चार वेळा निवडून आले आहेत. 2024 वर्षीच्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 50 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत होते. 2002 मध्ये भाजप कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रिय झालेले चव्हाण यांनी 2005 मध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवकपद मिळवलं. 2007 मध्ये स्थायी समितीचे सभापती, तर 2009 पासून डोंबिवलीच्या आमदारपदी त्यांची सलग निवड होत आली आहे. 2016 मध्ये राज्यमंत्री, तर 2024 मध्ये कॅबिनेट मंत्री अशी वाढती राजकीय कक्षा त्यांनी गाठली आहे.

Sudhir Mungantiwar : हिंदीवर वाद दुर्दैवी; मराठीवर कुठलाही दबाव नाही

प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपची ‘कॅल्क्युलेटेड मूव्ह’

भाजपमध्ये केवळ मताधिकारावरून नव्हे, तर संघटनशक्ती, स्थानिक पातळीवरील प्रभाव, व मतदारांशी नाळ जोडणं या सर्व बाबींचा विचार करून नेतृत्वनिर्धारण होतं. या सर्व निकषांवर रवींद्र चव्हाण हे सर्वार्थाने पात्र ठरत असल्याने त्यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांना 1 जुलैच्या संध्याकाळची प्रतीक्षा लागली असून, त्याच दिवशी नव्या प्रदेशाध्यक्षाची अधिकृत घोषणा होणार आहे. संघटनेतून वर आलेला नेता, जो युवा मोर्चातून सुरुवात करून सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आता संघटनेच्या सर्वोच्च जबाबदारीपर्यंत पोहोचतो, अशा रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपची नवी वाटचाल सुरू होणार हे निश्चित दिसत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!