महाराष्ट्र

मूळ महाराष्ट्रीयन IPS Shivdeep Lande यांचा राजीनामा मंजूर

बिहारमध्ये गाजली होती Singham म्हणून कारकीर्द

Post View : 25

Author

 तरुणांसाठी आयकॉन बनलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. पोलिस सेवा सोडल्यानंतर लांडे आता बिहारमध्ये स्थायिक होणार आहेत.

विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट 1976 रोजी जन्मलेले शिवदीप बिहार राज्यात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. बिहारमध्ये त्यांना सिंघम म्हणूनच ओळखलं जायचं. त्यांच्या कारकीर्दीची बिहार सरकारनं दखल घेतली होती. त्यानंतर लांडे यांना पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. आयजी झाल्यानंतर काही काळपर्यंत लांडे महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी पोलिस दलातील सेवेचा राजीनामा दिला. आता त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. त्यानंतर गृहमंत्रालयानं लांडे यांची सेवा 13 जानेवारी 2025 पासून समाप्त झाल्याची घोषणा केली आहे.

पोलिस दलातून बाहेर पडल्यानंतर लांडे यांनी आता बिहारमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या परिवारासह ते बिहारमध्ये वास्तव्य करणार आहे. शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता. अनेक महिन्यांपर्यंत सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. बिहार सरकारनं लांडे यांना राजीनामा देऊ नये, असा आग्रह धरला होता. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर नेत्यांपर्यंत अनेकांनी लांडे यांच्याशी याबाबत चर्चाही केली होती. मात्र लांडे राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर ठाम होते. त्यामुळं बिहार सरकारनं राजीनामा केंद्रीय गृहमंत्रालयाकडं पाठविला होता.

महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर Nagpur प्रशासन कामावर

युवकांना क्रेझ

बिहारमधील शिवदीप लांडे यांची कारकीर्द प्रकाशझोतात आली. त्यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमधील तरुणाईसाठी लांडे आयकॉन बनले. अनेकांनी त्यांच्या प्रमाणे आयपीएस होण्यासाठी तयारी सुरू केली. सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले शिवदीप यांचे वडील वामनराव हे अकोला जिल्ह्यातील रहिवासी. शिवदीप 2006 तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. 02 फेब्रुवारी 2014 रोजी शिवदीप यांचा विवाह ममता शिवतारे यांच्याशी झाला. ममता आणि शिवदीप यांना आरा नावाची मुलगी आहे. शिवदीप आपल्या पगारातील जवळपास 60 टक्के रक्कम गरीब मुलांच्या सामूहिक विवाह आणि शिक्षणासाठी खर्च करतात. अकोला जिल्ह्यात वसतिगृह आणि कोचिंग क्लास चालविणाऱ्या संस्थेलाही ते रक्कम दान करीत असतात.

गरीब परिवारातील मुलंमुली शिक्षणापासून वंचित राहू नये, हा यामागील हेतू असल्याचं ते सांगतात. बिहारच्या पूर्णिया येथे शिवदीप आयजी होते. पूर्णियातील त्यांनी नियुक्ती व बदली केवळ 33 दिवसात झाली होती. त्यामुळं पूर्णियात सगळ्यात कमी कार्यकाळ असलेले आयजी शिवदीप लांडे बनले होते. पूर्णियातील पदभार स्वीकारल्यानंतर 13 दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला होता. सर्वकाही सुरळीत असताना लांडे यांनी राजीनामा दिल्यानं अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. शिवदीप लांडे यांचे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत. पोलिस दलातील सेवा समाप्त झाल्यानंतर शिवदीप लांडे राजकारणात प्रवेश करणार की सामाजिक क्षेत्रात याकडं अनेकांचं लक्ष आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!