महाराष्ट्र

Rohit Pawar : कोकाटेंच्या गेमला रोहित पवारांचा शो स्टॉपर सवाल

Manikrao Kokate : रमीची जाहिरात स्किप करायला 42 सेकंद कसे?

Author

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळतानाचा आणखी एक व्हिडिओ रोहित पवारांनी जनतेसमोर मांडला आहे. जाहिरात स्कीप करायला 42 सेकंद लागतात का? असा थेट सवाल करत त्यांनी कोकाटेंच्या स्पष्टीकरणाला धुळीस घातलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अनोखा गेम रंगला आहे. कुणी पत्त्यांचा, तर कुणी राजकीय बाणांचा. सभागृहात खेळ सुरू आहे, पण तो विषयांचा नाही, तर पत्त्यांचा. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेतील पत्ते खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला नवे वळण देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आणखी दोन व्हिडीओ शेअर करत कोकाटे यांच्या ‘जाहिरात स्कीप करत होतो’ या कारणावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांनी नुकतेच दोन नवे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत महायुती सरकार आणि कोकाटे यांना अडचणीत आणले आहे. कोकाटे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले होते की, ते यूट्यूबवर व्हिडीओ पाहत असताना मध्ये ‘रम्मी’ची जाहिरात आली आणि ती स्कीप करत होते. मात्र यावर रोहित पवार यांनी टीका करत विचारलं आहे की, पत्त्याची कोणती जाहिरात स्कीप करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? या एका वाक्याने त्यांनी संपूर्ण घटनाक्रमाचं गांभीर्य पुन्हा समोर आणलं.

Vijay Wadettiwar : शेतकरी फासावर अन् कृषीमंत्री पत्त्यांच्या डावावर

पत्ते खेळण्यात गुंतले

केवळ याच टीकेवर थांबत न राहता रोहित पवारांनी आणखी गंभीर आरोप केले. कोकाटेंनी म्हटलं होतं की, त्यावेळी सभागृहाचं कामकाज संपलं होतं. मात्र, रोहित पवार यांनी यावर आक्षेप घेत स्पष्ट केलं की, सभागृहात तेव्हा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती. आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना दुधाळ जनावरं देण्यासंदर्भातील चर्चा सुरू असताना, कृषिमंत्री मात्र मोबाईलमध्ये रम्मी खेळण्यात गुंतले होते. ओसाड गावचे पाटील अशा चर्चेला महत्त्व देत नसावेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

Anil Deshmukh : बळीराजाच्या मरणावर मंत्र्यांचा पत्त्यांचा उत्सव 

या व्हिडीओ प्रकरणामुळे आधीच दबावात असलेल्या कोकाटेंच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. विरोधकांनी एकमुखाने राजीनाम्याची मागणी जोरात केली आहे. सभागृहात जे घडलं, ते केवळ नियमभंग नव्हे, तर शेतकरी आणि आदिवासी समाजाचा अपमान आहे, असं म्हणत रोहित पवारांनी कोकाटेंना राजीनाम्यासाठी पुन्हा एका राजकीय कोपऱ्यात ढकललं आहे.

या प्रकरणावरुन हे स्पष्ट होतंय की, कोकाटे यांचा ‘स्कीप’ बटन वेळेत न दाबल्याने, आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ‘गेम’वरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पुढे काय होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, पण सध्या तरी रोहित पवारांनी ‘रम्मीच्या जाहिरातीतून’ कोकाटेंचा सारा खेळच उघडा पाडला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!