
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरील विधानामुळे संजय गायकवाड वादात अडकले. वाढलेल्या संतापानंतर त्यांनी माफी मागून शब्द मागे घेतले.
मराठी भाषेच्या रक्षणासाठी राजकारणात पुन्हा एकदा ज्वाला भडकली आहे. इतिहासातील तेजस्वी मराठी महापुरुषांचा संदर्भ घेतला गेला. पण शब्दांची निवड चुकल्याने चिखलफेक सुरू झाली. एकीकडे वरळीच्या व्यासपीठावर ठाकरे बंधूंनी मराठी एकजूट दाखवली, तर दुसरीकडे सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांच्या एका विधानाने राजकीय रणभूमी तापली. संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे निर्माण झालेला संताप इतका तीव्र झाला की, अखेर गायकवाडांना आपले शब्द मागे घेत ‘दिलगिरीचे कवच’ परिधान करावे लागले.
मुंबईच्या वरळीमध्ये एक ऐतिहासिक क्षण घडला. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. मराठी अस्मितेच्या मुद्यावर दोघांनी एकत्रित भूमिका मांडली. मात्र, या एकतेनंतर राजकारणाचा सूर बदलला. सत्ताधारी गोटातून टीका सुरु झाली आणि त्यात शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेले विधान एकच वादळ घेऊन आलं.

उसळली संतापाची लाट
लातूरच्या हाडोळती गावात एका वृद्ध शेतकऱ्याला बैलजोडी देण्यासाठी गेलेल्या गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना त्रिभाषा सूत्रावर भाष्य करताना छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, ताराराणी, येसूबाई आणि जिजाऊ यांच्या विद्वत्तेचा उल्लेख करत, संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? जिजाऊ, येसूबाई यांनी भाषा शिकल्या, त्या मूर्ख होत्या का? असे शब्द उच्चारले. या विधानात “मूर्ख” हा शब्द वापरल्याने सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली. शिवप्रेमींनी त्याचा तीव्र विरोध केला, तर ठाकरे गट व मनसेने यावरून गायकवाडांवर खरमरीत टीका केली.
विरोधकांचा घणाघात
ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी गायकवाडांच्या विधानाचा समाचार घेतला. त्यांच्या मते, संभाजी महाराजांचा उल्लेख करत अशा शब्दांचा वापर हा शिवप्रेमींना अपमानास्पद वाटतो. सोशल मीडियावर गायकवाडांच्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप अजूनच वाढला. वाद वाढताच, 7 जुलै सोमवारी गायकवाडांनी माफी मागितली. मी शिवभक्त आहे. माझं शिवप्रेम महाराष्ट्राला माहीत आहे. माझ्या शब्दांचा अनर्थ केला गेला. पण तरीही माझ्या बोलण्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल, तर मी माझं विधान मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्ट करत त्यांनी थेट माफी मागितली.
ठाकरेंवर हल्ला
संजय गायकवाड इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे ठाकरे बंधूंवरही टीका केली. पंधरा वर्षांपूर्वी जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते, तर काहीतरी बदल दिसला असता. पण उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा विचार सोडून गेले. राज ठाकरे यांनी खूप उशीर केला. त्यामुळे आता याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. बाळासाहेब जिवंत असताना सुद्धा 288 आमदार निवडून आले नाहीत. म्हणजे ठाकरे ब्रँड चालत नाही, असे त्यांनी ठणकावले.