बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत भाषावादाला नवा रंग दिला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीबरोबर उर्दू भाषा शिकवण्याची मागणी करत मनसेवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंदी भाषा सक्तीविरोधातील वादावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या, आणि त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला खास रंग चढवला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषा इयत्ता पहिल्यापासून अनिवार्य करण्याच्या निर्णयाला थेट विरोध केला होता. मात्र, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. त्यामुळे भाषेविषयक चर्चा काहीशी थांबली होती. परंतु आता पुन्हा एकदा हेच मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हं आहेत. कारण शिंदे गटाचे नेते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त आणि अनपेक्षित वक्तव्य केलं आहे.
बुलढाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना गायकवाड यांनी भाषेच्या मुद्द्यावर सडेतोडपणे मत मांडलं. हिंदी राष्ट्रभाषा नाही म्हणणाऱ्यांवर टीका करत त्यांनी मनसेला टोला लगावला. ते म्हणाले, जर महाराष्ट्राबाहेर आपण गेलो, आणि हिंदी नसेल तर संवाद कसा साधायचा. आज देशभरात कुठेही गेलं तरी हिंदी आणि इंग्रजीत संवाद होतो, त्यामुळे हिंदी शिकणं गरजेचं आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी पुढे जाऊन एक वादग्रस्त प्रस्ताव मांडला. हिंदीबरोबरच उर्दू भाषाही पहिल्या वर्गापासून शिकवली गेली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं. त्यांच्या मते, भाषेच्या ज्ञानामुळे केवळ संवादच नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही फायदे होऊ शकतात.
Ravindra Singhal : पोलिसांच्या कारवाईने संशयितांचे उडाले तीनतेरा
संभाजी महाराजांचा दिला दाखला
गायकवाड यांनी उर्दू शिकवण्यामागे एक वेगळीच कारणमीमांसा दिली. दहशतवादी अनेकदा उर्दूत संदेश पाठवतात, पण आपल्याला ती भाषा नीट समजत नाही. त्यामुळे महत्त्वाचे संदेश हुकतात. जर आपण उर्दू शिकलो, तर अशा संदेशांना वेळेत ओळखता येईल आणि दहशतवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवता येईल, असं ते म्हणाले. इतक्यावरच न थांबता त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला देत भाषाशिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. संभाजी महाराजांना १६ भाषा अवगत होत्या. शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊही बहुभाषिक होते. त्यांनी वेगवेगळ्या भाषा शिकून चूक केली का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाषेच्या विविधतेला अभिमानाने समोर आणलं.
संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भाषेच्या मुद्द्यावर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीला विरोध करणारी मनसे आणि आता उर्दू शिकवण्याची मागणी करणारे शिंदे गटाचे नेते या दोन परस्परविरोधी भूमिकांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हं आहेत. राज्यातील भाषा राजकारणाचा हा नवा अध्याय नेमका कुठे पोहोचतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Vijay Wadettiwar : पर्यटकांचे प्राण गेले, पण तुम्ही उपकार गिनता
