
आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यावरून त्यांनी विधान मागे घेत असल्याचे सांगितले.
बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस खात्याविषयी वापरलेल्या अशोभनीय भाषेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिस्थितीचा गंभीरपणे विचार करत फडणवीसांनी गायकवाड यांच्यावर थेट संताप व्यक्त केला आहे. शिंदे यांनीही त्यांना कडक शब्दात सुनावल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बुलढाणा दौरा होणार आहे. अशा परिस्थितीत गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापले आहे. त्यानंतर दबावाखाली येऊन संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे.
Devendra Fadnavis : गृहमंत्र्यांचा निर्धार, एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात नाही दिसणार
विधान मागे घेतले
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर थेट गंभीर आरोप करत, संपूर्ण विभागाला बदनाम केले. महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम खाते जगात कुठेही नाही, असे सांगत त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट शंका घेतली. एवढ्यावरच न थांबता, पोलिस भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप केला. 50 लाख पकडले तर 50 हजार दाखवतात, अशी तीव्र टीका त्यांनी केली. याशिवाय, गुटखाबंदी आणि दारूबंदीचे कायदे आल्यावर पोलिसांचा हप्ता वाढतो, असे सांगत पोलिस खात्याचा स्वच्छतेचा दावा त्यांनी चिरडून टाकला. पोलिसांनी जर वर्षभर प्रामाणिकपणे काम केले तर सगळे सुरळीत चालेल, असा आरोप करून त्यांनी संपूर्ण यंत्रणेवर अविश्वास दाखवला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी आपले विधान मागे घेत असल्याचे सांगितले. माझ्या वक्तव्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना त्रास झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो,असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाचे आणि कर्तृत्वाचे कौतुक केले. मात्र, काही अपप्रवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण खात्याला गालबोट लागल्याचेही ते म्हणाले, त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपल्या आरोपांचा पाठींबा कायम ठेवला. आपल्या मुलाला मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख करताना, गायकवाड यांनी पुन्हा एकदा पोलिसांवरील अविश्वास व्यक्त केला. माझ्या घरासमोर गाडी जळाली, तरीही तपास झाला नाही, असे सांगत त्यांनी बुलढाण्यातील दोन पोलिसांना थेट चोरांचे सरदार ठरवले. पोलिस खात्याच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकतेवर त्यांनी सातत्याने संशय व्यक्त केला.
संतापाची लाट
संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच अस्थिर झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तंबीने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटातील वरिष्ठ नेतेही यावर नाराजी व्यक्त करत आहेत. गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याने त्यांच्यावर आणखी राजकीय दडपण आले आहे. विरोधकांनीही यावर टीकेची झोड उठवली आहे. पोलिसांचा अपमान करणाऱ्या लोकांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. संजय गायकवाड यांच्यासाठी आगामी काळात राजकीय वाटचाल कठीण होण्याची चिन्हे दिसत आहेत.