महाराष्ट्र

Prakash Ambedkar : शरद पवार हे भाजपाचे हायप्रोफाईल हस्तक

Maharashtra : प्रकाश आंबेडकर यांचा स्फोटक दावा

Author

राजकारणाच्या रंगमंचावर एक मोठा स्फोटक दावा झाला आहे. प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांच्यावर थेट भाजपाचे हस्तक असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत संथपणे वाहणाऱ्या प्रवाहाला आता एक आक्राळविक्राळ वळण लागण्याची चिन्हं आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधत, त्यांच्यावर भाजपाचे ‘हस्तक’ असल्याचा थेट आरोप करताच राजकीय वर्तुळात हलकल्लोळ माजला आहे. त्यांच्या या विधानामुळे इंडिया आघाडीच्या सद्यस्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकरांनी अनेक धक्कादायक विधाने केली. त्यांनी देशातील राजकीय विरोधकांवर लकवा मारल्याची बोचरी टीका करत, सध्या केवळ एकाच व्यक्तीभोवती म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या भोवती देशाची सत्ता फिरते आहे, असे विधान केले. विरोधक निष्क्रिय झाले आहेत. त्यांच्या हातून काहीच होणार नाही. नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणीत आला आहे. त्यामुळे देशाला वाचवायचं असेल, तर मतदारांनी आता खऱ्या अर्थाने सावध राहिलं पाहिजे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

Prakash Ambedkar : मोदींच्या ट्रम्प मंत्राने, देशाचे आर्थिक तंत्र ढवळले

मोदींना आव्हान

प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय यंत्रणेतील मोठ्या नेत्यांची थेट नावं घेत, त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न उपस्थित केला. राहुल गांधी, अखिलेश यादव आणि शरद पवार यांच्यात नरेंद्र मोदींना थोपवण्याची हिंमत आहे का? आजच्या परिस्थितीत मोदींना आव्हान द्यायचं असेल, तर केवळ नावे नाही, तर त्यामागे कृती आणि संकल्पाची धार असावी लागते, असं म्हणत त्यांनी या नेत्यांना अप्रत्यक्षपणे राजकीय ‘खोटे विरोधक’ ठरवलं.

आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत शरद पवारांवर थेट आणि गंभीर आरोप केला. शरद पवार हे प्रत्यक्षात भाजपा विरोधक नसून, त्यांच्या हातातील एक शहामृग आहेत. इंडिया आघाडीत बसून ते वेगळे नाटक करतात. पण त्यांचं संपूर्ण कनेक्शन भाजपा सत्ताकेंद्राशी आहे. आणि ते त्यातून बाहेर पडू शकत नाहीत, असा जळजळीत दावा त्यांनी केला. राजकारणात अशा प्रकारची उघड भूमिका घेणं अत्यंत दुर्मीळ मानलं जातं, आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने एक नवाच वादंग उठण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi : विधानसभा मतदान भटकंतीचा गूढ अखेर उलगडला

राजकारणात मोठे उलथापालथ

या सगळ्या पार्श्वभूमीवर, देशात आगामी पंधरा दिवसांत राजकीय पटलावर मोठा भूकंप होणार असल्याचा सूचक इशारा आंबेडकरांनी दिला. पंधरा दिवसांत देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल. सध्या जी मंडळी समोर आहेत, ती खरेखुरे निर्णायक नेते नाहीत. खरा निर्णय घेणारे नेते लोकांच्या नजरेपासून दूर आहेत, असं म्हणत त्यांनी राजकारणातील पडद्यामागच्या घडामोडींचं गूढ अधोरेखित केलं.

या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. जर निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर झाला नाही, तर वंचित बहुजन आघाडी ही निवडणुकीत सहभागी होणार नाही. आम्ही पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो. आणि याच भूमिकेवर ठाम राहून आम्ही निवडणूक बहिष्कृत करू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी यावरून इतर विरोधकांवरही टीका करत, विरोधक कुठेच दिसत नाहीत. त्यांना कोणी विचारतही नाही. सध्या या सत्तेच्या विरोधात आम्हीच एकमेव रस्त्यावर उतरलेलो आहोत, असं म्हटलं.

संपूर्ण घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते की, देशात आणि राज्यात विरोधकांच्या नावावर जे काही चाललं आहे. त्यामागे धागेदोरे अनेक दिशांनी फिरत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी त्यावर टाकलेला प्रकाश एकाच वेळी अनेकांवर झोत टाकतो आहे. खासकरून त्या नेत्यांवर, जे जनता समोर ‘विरोधक’ म्हणून उभे राहतात, पण ज्या मागच्या गल्ल्यांमधून त्यांच्या राजकीय हालचाली चालतात, त्या सामान्यांच्या नजरेपासून लपवलेल्या असतात.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!