महाराष्ट्र

Sharad Pawar : देवाभाऊ पोस्टरबाजी थांबवा, बळीराजाला आधार द्या

Maharashtra : शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज देताना पवारांचा प्रहार

Post View : 1

Author

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आक्रोशाला आवाज देत सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी कर्जमाफी, हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना तातडीच्या मदतीची मागणी करत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.

महाराष्ट्राच्या मातीतून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडली. नाशिकच्या रणरणत्या उन्हात काढलेल्या आक्रोश मोर्चातून त्यांनी शेतकऱ्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या बळीराजाला आधार देण्याची जबाबदारी सरकारने झटकल्याचा आरोप त्यांनी केला. हजारो कार्यकर्त्यांसह जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत हा मोर्चा नाशिकच्या रस्त्यांवर धडकला. जिथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शने झाली. सरकारच्या नाकर्तेपणावर पवारांनी सडेतोड टीका करत शेतकऱ्यांच्या संकटाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना खडसावले.

शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेचा हुंकार आणि सरकारच्या आश्वासनांचा भंग यावर पवारांनी भाष्य केले. गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी कर्जाच्या बोझ्याखाली आणि नैसर्गिक आपत्तींमुळे आत्महत्या केल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषत: मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर आहे. सरकारने दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. पवारांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘देवाभाऊ’ मोहिमेवरही ताशेरे ओढले. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते, पण बळीराजाच्या दुरवस्थेकडे ढुंकूनही पाहिले जात नाही.

Ashish Shelar : सुळे-पवार आधी राजीनामा द्या

सरकारचे मौन

शेतकऱ्यांचे संकट हे केवळ निसर्गाचे नाही, तर सरकारच्या बेपर्वाईचे आहे, असे पवारांनी ठणकावले. अतिवृष्टीने बीडसारख्या दुष्काळग्रस्त भागातही शेती उद्ध्वस्त झाली, पण मदतीसाठी शेतकरी तडफडत आहे. सरकारने संकटातून मार्ग काढण्याऐवजी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. पवारांनी यवतमाळच्या एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची आठवण सांगितली. जिथे त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट देऊन 70 हजार कोटींची कर्जमाफी मंजूर केली होती. आज मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी असा कोणताही ठोस निर्णय दिसत नाही.

Prakash Ambedkar : अराजकतेच्या व्याकरणात मोदींचे परराष्ट्र धोरण

पवारांनी ‘देवाभाऊ’ मोहिमेवर टीका करताना ऐतिहासिक दाखला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुष्काळात शेतकऱ्यांना सोन्याची नाणी आणि नांगर देऊन आधार दिला होता. आज मात्र सत्ताधारी केवळ पोस्टरबाजी करत बळीराजाला विसरले आहेत. पवारांनी इशारा दिला की, जर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर नाशिकचा हा मोर्चा अधिक उग्र रूप घेईल. या मोर्चातून शेतकऱ्यांना हमीभाव, कापसावरील आयातशुल्क वाढ, संपूर्ण कर्जमाफी आणि महिलांसाठी 2 हजार 100 रुपयांची आर्थिक मदत यासारख्या मागण्या जोरकसपणे मांडण्यात आल्या. पवारांच्या नेतृत्वाखालील हा लढा शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा अटळ संकल्प दर्शवतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!