प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परराष्ट्र धोरणातील अराजकता आणि मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मोदींचे नेतृत्व हे देशाच्या हितसंबंधांना हानी पोहोचवणारे आणि जनतेच्या जखमांवर मीठ चोळणारे असल्याचे ठणकावले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर सणसणीत टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी मोदींचे धोरण हे भारतीय हितसंबंधांना छेदणारे आणि अराजकतेचे व्याकरण ठरत असल्याचा घणाघाती आरोप केला. भारताचे पारंपारिक परराष्ट्र धोरण अमेरिका आणि रशिया यांच्यातील समतोल राखण्याचे आहे; परंतु, मोदी सरकारच्या अयशस्वी नेतृत्वामुळे आणि चुकीच्या आर्थिक परराष्ट्र धोरणामुळे या दोन्ही देशांशी भारताचे संबंध ढासळले असल्याचे आंबेडकर यांनी ठणकावले. यासोबतच, त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीवरून मोदींवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला, त्यांना मणिपूरच्या जनतेची थट्टा करणारे ठरवले.
आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत आपली मते स्पष्टपणे मांडली. अमेरिकेच्या 50 टक्के शुल्कामुळे भारत-अमेरिका संबंध 1970 च्या दशकातील अस्थिर काळात लोटले गेलेत, तर रशियाचा चीनकडे वाढता झुकाव आणि व्यापारात चिनी युआनच्या वाढत्या मागणीमुळे भारतासमोर नवे संकट उभे आहे. हे सर्व मोदींच्या परराष्ट्र धोरणातील अपयशाचे द्योतक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मणिपूरमधील हिंसाचाराला भाजपच्या कारस्थानांचा भाग ठरवत, तेथील जनतेच्या दुखण्यांवर ढोंगी सहानुभूती दाखवण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
Acharya Devavrat : गुजरातच्या राज्यपालांच्या हाती आता महाराष्ट्राची धुरा
चामडा उद्योगावरील संकट
अमेरिकेचे 50 टक्के शुल्क आणि रशियाचे चीनशी वाढते सख्य यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची भीती आंबेडकर यांनी व्यक्त केली. विशेषतः दलित समुदायाद्वारे चालवला जाणारा चामडा उद्योग संकटात सापडेल, असा इशारा त्यांनी दिला. 2020-21 मध्ये 3.6 अब्ज डॉलर्सची निर्यात करणारा हा उद्योग 2024-25 मध्ये 4.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. यातील 1.04 अब्ज डॉलर्सची निर्यात अमेरिकेला होते. जर यात 40-50 टक्के घट झाली, तर 4 ते 5 लाख नोकऱ्या धोक्यात येतील. ज्यामुळे दलित समुदायावर मोठा आघात होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
मणिपूरमधील परिस्थितीवर टीका करताना आंबेडकर यांनी मोदींच्या वक्तव्याला मणिपूरच्या जखमांवर मीठ चोळणारे ठरवले. मणिपूरला ‘भारताच्या मुकुटातील रत्न’ म्हणणारे मोदींचे शब्द हे पीडित जनतेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले. मणिपूरमधील हिंसाचार, वांशिक शुद्धीकरण आणि लैंगिक अत्याचार यांना भाजप सरकारचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मोदींची शांतता आणि त्यांचे मणिपूरबाबतचे ढोंग हे सत्य दडपण्याचे कारस्थान असल्याचे आंबेडकर यांनी ठासून सांगितले. त्यांच्या मते, मोदींचे धोरण आणि नेतृत्व केवळ अराजकता आणि अन्यायाला खतपाणी घालत आहे.
