महाराष्ट्र

Nagpur : महापालिका ठरली मोहरा, बिल्डर झाला बादशाह 

Kishor Tiwari : प्रफुलच्या साम्राज्याने नागपूरकरांच्या आशांवर चढवले बुलडोझर

Post View : 17

Author

लंडन स्ट्रीट प्रकल्पाच्या नावाखाली नागपूरकरांची स्वप्नं, आशा आणि हक्कांचे बेरजेत लिलाव सुरू आहे. स्वघोषित प्रशासक ‘अतिक्रमण वीर प्रफुल’च्या राजवटीत जनतेसाठी राखीव जमिनींचा कायद्यानंच विध्वंस झाला आहे.

नागपूर शहराच्या भांमटी, खामला, जैताळा भागात सध्या ‘लंडन स्ट्रीट’ नावाचा एक प्रकल्प सुरू आहे. पण या प्रकल्पामागे दडलेली खरी कहाणी आता उघडकीस येत आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी धडक पत्रकार परिषद घेत ‘लंडन स्ट्रीट’ प्रकल्पाचा खंडन केला आहे. या प्रकल्पास ‘अतिक्रमण वीर प्रफुल स्ट्रीट’ असे नाव द्यावे, अशी उपरोधिक आणि तीव्र मागणी केली आहे.

तिवारी यांनी थेट नाव घेऊन सांगितले की, स्वतःला नागपूर महानगरपालिकेचा छुपा प्रशासक समजणाऱ्या ‘अतिक्रमण वीर प्रफुल’ नावाच्या बिल्डरने संपूर्ण लंडन स्ट्रीट प्रकल्प गिळंकृत केला आहे. हे नागपूरकरांच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे. 2008 मध्ये नागपूर महानगरपालिकेला ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीकडून 5.5 किलोमीटर लांब रेल्वे ट्रॅकवरील तब्बल 34 लाख 45 हजार चौरस फूट जमीन विनामूल्य मिळाली होती. याचा उद्देश स्पष्ट होता, नागरीकांसाठी शाळा, दवाखाने, उद्याने, बाजार यासारख्या मूलभूत सोयी-सुविधा निर्माण करणे. मात्र, महापालिकेने हा उद्देश पूर्ण न करता संपूर्ण जमीन भूखंड लिलावासाठी वापरली.

बाजार गेला, प्रफुल आला

सिता नगर, खामला, भांमटी, जैताळा बाजार चौक अशा गर्दीच्या भागांमध्ये आजही सामान्य विक्रेते फळं-भाज्यांचे टोपले घेऊन फुटपाथवर बसतात. तरीही या भागात बाजार उभारण्याऐवजी महत्त्वाचे भूखंड ‘प्रफुल’ नामक बिल्डरकडे गेल्याचे उघड झाले आहे. लिलावाची प्रक्रिया देखील पारदर्शक न राहता अशी रचली गेली की, भूखंड क्रमांक 1, 1A, 4 व 5 याचे हक्क केवळ ‘अतिक्रमण वीर प्रफुल’ याच्याच ताब्यात गेले.

Maharashtra : थेट डोनाल्ड ट्रम्पच आले लाडक्या बहिणींसाठी धावून 

काही दिवसांपूर्वी, ‘प्रफुल’ नावाच्या या बिल्डरने फळे-भाज्यांचे विक्रेते, मांसविक्रेते यांना हटवून बिनपरवाना टिनाचे कंपाउंड ठोकले, असा गंभीर आरोप तिवारी यांनी केला. महानगरपालिकेचा प्रशासनदेखील यावेळी मूकदर्शक बनून प्रफुल याचे आदेश मानत होता. हे पाहून तिवारी यांनी संताप व्यक्त केला.

गडकरींच्या नावाने काम 

तिवारी यांचा दावा आहे की, ‘प्रफुल’ हा नितीन गडकरी यांचे नाव घेत संमती असल्याचा खोटा देखावा निर्माण करतो आहे. गडकरी हे संघाचे स्वयंसेवक असून, त्यांनी कधीच दलालगिरी किंवा बिल्डरशाहीला थारा दिला नाही. त्यामुळे या अफवांची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. लंडन स्ट्रीट प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरकरांची सरळसरळ फसवणूक करण्यात आली आहे.

सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या PU जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. प्लॉट क्रमांक 1A मधील बांधकामासाठी सिता नगरमधील एक सार्वजनिक मैदान तब्बल वर्षभर वापरण्यात आले. इतकेच नाही, तर प्लॉट क्रमांक 4 आणि 5 मधील तिन्ही बाजूंवरील फुटपाथवरही बिनधास्त अतिक्रमण करून नागरिकांचा चालण्याचा मार्गही बळकावण्यात आला.

विशिष्ट व्यक्तीच्या फायद्यासाठी

या प्रकल्पासाठी जमीन नागपूरकरांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा जसे की बाजारपेठा, उद्याने, शाळा, दवाखाने उभारण्यासाठी मिळवली गेली होती. परंतु प्रत्यक्षात या जमिनीवर कोणतीही सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. संपूर्ण प्रकल्प एका विशिष्ट बिल्डरच्या फायद्यासाठी वापरण्यात आला आहे. नागपूरकरांच्या हक्कावर गदा आणण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात काही गंभीर आणि अनुत्तरित प्रश्न उपस्थित होतात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, हा ‘प्रफुल’ नेमका आहे तरी कोण? तो इंदूरमध्ये आपले व्यावसायिक जाळे विस्तारणारा, काँग्रेसशी निष्ठावान असलेला कोणी आहे की, स्थानिक सत्तेच्या आडून नागपूरमध्ये समांतर सरकार चालवणारा प्रभावशाली बिल्डर? दुसरा गंभीर प्रश्न म्हणजे, लंडन स्ट्रीटसारख्या मोठ्या प्रकल्पासाठी निधी कुठून येतो आहे?

अनेक प्रश्न 

महापालिकेच्या अटींनुसार तो कर्ज घेण्यास पात्र नसतानाही मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू कसे आहे? एवढा मोठा प्रकल्प असूनही महापालिकेने त्याच्याकडून कोणतीही सुरक्षारक्कम, प्रीमियम किंवा अन्य अनिवार्य शुल्क का घेतले नाही? उलटपक्षी, सर्व नियम धाब्यावर बसवून या बिल्डरला संपूर्ण प्रकल्पावर मुक्तपणे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे सर्व प्रश्न प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीवर गंभीर शंका निर्माण करतात.

शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी म्हटले की, नागपूरकरांची फसवणूक करणाऱ्या या लंडन स्ट्रीट घोटाळ्यात उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. गडकरी व फडणवीस यांच्या नावे होणाऱ्या अफवांवरही लगाम बसवायला हवा. अशा प्रकारच्या बिल्डरांवर कारवाई होऊन नागपूरकरांना न्याय मिळावा.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!