पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत POK वर जोरदार एअर स्ट्राईक करत चोख प्रत्युत्तर दिलं. या शौर्यपूर्ण कारवाईच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जल्लोषात अभिनंदन करण्यात आले.
देश पुन्हा एकदा अभिमानाने ऊर भरून घेत आहे. काश्मीरच्या पहलगाम परिसरात भारतीय नागरिकांवर व जवानांवर करण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने निर्णयात्मक पावलं उचलली आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत एअर स्ट्राईक केला. हा केवळ प्रत्युत्तर नव्हे, तर भारताच्या नव्या सुरक्षा धोरणाचा सुस्पष्ट संदेश आहे , “आम्ही माफ करणार नाही”.
भारतीय सेनेच्या या धाडसी कारवाईचा जल्लोष देशभरात सुरू आहे. अकोला शहरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वीर जवानांच्या धाडसाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 7 मे 2025 बुधवार रोजी दुपारी गांधी चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फटाक्यांची आतषबाजी, लाडू वाटप, घोषणाबाजी आणि देशभक्तीपर गाण्यांनी परिसर राष्ट्रभक्तीच्या तेजाने उजळून निघाला. कार्यक्रमाचे नेतृत्व शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी केले, तर त्यांच्या सोबत जिल्हा प्रमुख मंगेश काळे, उपजिल्हा प्रमुख तरुण बगेरे, मुकेश मुरूमकार, उपशहर प्रमुख शरद तुरकर, संजय अग्रवाल यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
सैन्याच्या पाठीशी
आमच्या वीर जवानांनी केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दाखवून दिलं की, भारत आता कुठल्याही हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी पूर्णतः सज्ज आहे, असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. शिवसैकांनी केंद्र सरकार व भारतीय सैन्याचे आभार मानले आणि देशवासीयांनी सैन्याच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं. गांधी चौकात जमलेल्या नागरिकांनी ‘भारतीय सेना अमर रहे, जय हिंद, वंदे मातरम् आणि POK मध्ये तिरंगा लहरवणारच’, अशा घोषणा देत उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अनेकांनी सैन्याच्या समर्थनार्थ नारे दिले, तर काहींनी “ऑपरेशन सिंदूर”च्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट्स व व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ही प्रभावी कारवाई म्हणजे भारताच्या नव्या सुरक्षानितीची झलक आहे. आता केवळ प्रतिकार नव्हे, तर प्रतिशोध ही नवी दिशा आहे, आणि त्यात भारतीय सैन्य आघाडीवर आहे.