महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच शिवसेना एकनाथ शिंदे गटानेही आपल्या तयारीला जोरदार वेग दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा गदारोळ माजला आहे. प्रत्येक पक्ष आपल्या मोर्चेबांधणीला लागलेला आहे. पक्षांतरांचा खेळ तर असा रंगला आहे की, जणू काही राजकीय बाजारात बार्गेनिंग सुरू आहे. अनेक वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर होणारी महापालिका निवडणूक आता चुरशीची होणार हे निश्चित. महापालिकेच्या सिंहासनावर कोण विराजमान होईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पण यंदा मित्रपक्ष एकत्र लढतील की स्वतंत्रपणे रिंगणात उतरतील, हे गूढही तितकेच रोमांचक आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या या रणधुमाळीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 13 सप्टेंबर 2025 रोजी नागपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीत या गटाने आपले पत्ते उघडले. शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत किंवा पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार निवडणूक लढवेल, असे ठरले. ज्या प्रभागात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असेल, त्या सर्वांची नावे पाठवा आणि यादी तयार करा, अशी सूचना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. या बैठकीला माजी खासदार आणि विद्यमान आमदार कृपाल तुमाने तसेच किरण पांडव उपस्थित होते.
शहरात कार्यकर्त्यांना प्रोत्साहन
नागपूर जिल्ह्यात आणि शहरात शिवसेनेची ताकद किती आहे, याचा आढावा घेण्यात आला. ही ताकद आणखी कशी वाढवता येईल आणि गरज पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसला कशी टक्कर देता येईल, यावर सखोल चर्चा झाली. आशिष जयस्वाल हे या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सोबतच प्रदेश पातळीवर पक्षप्रमुखांना फीडबॅक देत आहेत.नागपूरचा राजकीय इतिहास पाहता, येथे भाजपचे वर्चस्व प्राचीन किल्ल्यासारखे मजबूत दिसते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नागपूरात एकही आमदार नाही. त्यामुळे त्यांची ताकद सध्या तरी मर्यादित वाटते. पण महापालिका निवडणुकीत या शहरात शिवसेनेचा धमाका करायचा आहे, यासाठी शिंदे गटाने कमर कसली आहे.
नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आशिष जयस्वाल हे नागपूरच्या मोर्चा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नव्या जोमाने उभी राहत आहे. या निवडणुकीत शिवसेनेची रणनीती केवळ पक्षांतर किंवा युतीपुरती मर्यादित नाही. त्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले आहे. बैठकीत चर्चा झाली की, नागपूरमध्ये शिवसेनेची मुळे किती खोल आहेत. ती आणखी कशी मजबूत करता येतील. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व होत असल्याने, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे.
Nagpur Police : मतानींच्या शिलेदारांनी वाचवले अल्पवयीन बालिकेला
