नागपूर क्राईम ब्रांचने अवैध वेश्याव्यवसायावर जबरदस्त कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून तीन दलालांना अटक केली आणि सात महिलांची सुटका केली. ऑनलाईन माध्यमातून ‘नाईट आऊट’च्या नावाखाली चालणाऱ्या या गुन्हेगारी जाळ्याचा भांडाफोड करत पोलिसांनी शहरात खळबळ उडवून दिली आहे.
नागपूरच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध देहव्यवसायाच्या टोळीविरुद्ध ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत केलेल्या धडाकेबाज कारवाईने शहरातील गुप्त आणि ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला आहे. नाईट आऊट पार्टीच्या आड रंगत असलेला हा गैरव्यवहार फार्महाऊसपासून थेट हॉटेलपर्यंत पोहोचला आहे. नागपूर पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तीन दलालांना अटक केली आहे. सात महिलांची सुटका करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, या महिलांपैकी पाच जणी अलीकडेच विमानाने नागपूरला आणण्यात आल्या होत्या.
नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध, अनैतिक व ऑनलाइन माध्यमातून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन शक्ती’च्या माध्यमातून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहरातील ओयो हॉटेल्स, गेस्ट हाउस व खासगी फार्महाऊस मालकांना याबाबत स्पष्ट सूचना देऊनही काही ठिकाणी हे रॅकेट बिनधास्तपणे सुरू होते. मात्र पोलिसांच्या रणनीतिक छाप्यांनी त्यांचा बुरखा टराटरा फाडला.
पहिली कारवाई
पहिली कारवाई नागपूर जवळील नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या अजनी गावाजवळील ‘Dwell Stays Cocktail Camel’ या फार्महाऊसवर झाली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावर एका बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचण्यात आला. या ग्राहकाकडून एका महिलेचा सौदा एक हजार 500 रुपयांमध्ये ठरवण्यात आला. महिला खोलीत पोहोचताच पोलिसांनी धाड टाकून तिला ताब्यात घेतले व वेश्याव्यवसायातून मुक्त केले.
या कारवाईत 65 वर्षीय महिला दलाल लता बेलेकर हिला अटक करण्यात आली. तसेच फार्महाऊसचा व्यवस्थापक ईशान भोयर यालाही आरोपी करून अटक करण्यात आली. पोलिसांना ही फार्महाऊस मालक अमोल मानवतकर याचा शोध लागलेला नसून, तो फरार असून त्याचा तपास सुरू आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली, ज्यांना आर्थिक लालच दाखवून या धंद्यात ढकलण्यात आले होते.
Sanjay Rathod : सामाजिक मशालींना पालकमंत्र्यांचा नवा इंधनपुरवठा
दुसरी कारवाई
दुसरी कारवाई नागपूर शहरातील गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली. ‘स्वॅग स्टे राहुल हॉटेल’च्या बाहेरच्या रस्त्यावर पोलिसांनी पुन्हा एकदा बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचून एक मोठा रॅकेट उघड केला. या वेळी सुमित घाटे नावाच्या कार चालक दलालाला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला मुंबईची असून इतर चार कोलकाता येथून दोन दिवसांपूर्वीच विमानाने नागपूरला आणण्यात आल्या होत्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलांना ऑनलाईन ‘नाईट आऊट पार्टी’च्या नावाखाली उच्चभ्रू ग्राहकांना मुहैया करून देण्यात येत होते. या प्रकरणात तिघी महिलांचा सौदा थेट 21 हजार रुपयांमध्ये ठरला होता. ग्राहकाच्या रूपात असलेल्या पोलिसाच्या साक्षीने त्या महिलांना अटक करून त्यांच्याकडून उर्वरित दोन महिलांपर्यंत पोलिस पोहोचले आणि त्यांनाही वेश्या व्यवसायाच्या विळख्यातून बाहेर काढले. या प्रकरणात मुख्य आरोपी राहुल आणि सचिन हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ऑनलाईन वेश्याव्यवसायाचा नवा ट्रेंड
या प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली की, आता हे रॅकेट पारंपरिक पद्धतीने नव्हे तर सोशल मिडिया व मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून ‘हाय प्रोफाईल’ पार्टीजच्या नावाखाली हे कृत्य करत आहे. मोठमोठ्या फार्महाऊस किंवा हॉटेल रूम्समध्ये ऑनलाईन पेमेंट करून अशा मुली बोलावल्या जातात आणि त्यांचा सौदा थेट हजारोंमध्ये होतो. नागपूर पोलिसांनी याविरोधात आता व्यापक मोहीम उघडली असून शहरातील हॉटेल्स, लॉजिंग्स, फार्महाऊस मालकांना याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत की अशा प्रकारांपासून लांब राहावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
नागपूर क्राईम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दाखवलेले धाडस, गुप्त सापळ्याची यशस्वी अंमलबजावणी आणि तडफदार पद्धतीने महिलांना मुक्त करण्याचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. ‘ऑपरेशन शक्ती’ने आता फक्त वेश्याव्यवसायच नव्हे तर त्यामागचा संपूर्ण सायबर आणि लॉजिस्टिक नेटवर्कही उघड करण्याचा निर्धार केला आहे. येत्या काळात नागपूर पोलिसांकडून आणखी धडक कारवायांची शक्यता आहे आणि ती होणे आवश्यकही आहे. कारण या धंद्याच्या विळख्यात अडकलेल्या महिलांसाठी ही शक्ती एक आशेचा किरण ठरत आहे.
