स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संतप्त शिंदे समर्थकांनी थेट त्याच्या स्टुडिओमध्ये घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी कारण ठरलंय त्याने गायलेलं एक गाणं, ज्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यंगात्मक टीका आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टोलेबाजी करत त्यांना ‘गद्दार’ म्हणणं, हे काही जणांच्या पचनी पडलं नाही. यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत. आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कुणाल कामराने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये तो हे गाणं गाताना दिसतो. या गाण्यात त्याने ‘घराणेशाही संपवण्यासाठी कुणाचातरी बाप चोरला’ अशी खोचक टिप्पणी केली. त्याचप्रमाणे, ‘मंत्री नाही, तर हे दलबदलू आहेत’ असंही त्याने गाण्यात म्हटलं आहे. एवढंच नाही, तर ‘हे मंत्रालयापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जास्त असतात’ अशीही टीका त्याने केली आहे. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ शेअर करत कामराला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.
Maharashtra : बुलढाणा जिल्ह्यातून राज्यभरात ‘जीवंत सातबारा’चा नवा अध्याय
शिंदे गट आक्रमक
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनपर गाणं तयार केल्यानंतर शिवसैनिक अक्षरशः खवळले. त्यांच्या रोषाचा फटका बसला तो थेट द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलला, जिथे कामराचा स्टुडिओ होता. संतप्त शिवसैनिकांनी या हॉटेलमध्ये घुसून जोरदार तोडफोड केली. इतकंच नाही, तर रात्रीच तिथे होणाऱ्या शोचे बॅनरही हटवण्यात आले.
झालेल्या या प्रकारानंतर हॉटेलमध्ये पुन्हा स्टँडअप कॉमेडी होणार नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही या ठिकाणी अशा तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे आता वादग्रस्त शो बंदच करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचं कळतं. या हल्ल्यानंतर राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिक आक्रमक झाले आणि स्टुडिओ उद्ध्वस्त केला. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी ‘बदनामीकारक गाणी आम्ही सहन करणार नाही’ असा इशारा दिला आहे.
कामराची पहिली प्रतिक्रिया
गोंधळानंतर कुणाल कामराने आपल्या एक्स अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या हातात संविधान आहे आणि ‘हाच एकमेव मार्ग’ असं त्याने कॅप्शन दिलं आहे. यातून त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तो संविधानावर विश्वास ठेवतो.
पहिल्यांदाच असं झालेलं नाही. कुणाल कामरा यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामीला ट्रोल केल्यानंतर तो चर्चेत आला होता. तसेच, त्याने वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली आहे.
