महाराष्ट्र

Pune Swargate case: एसटी महामंडळामध्ये गणवेशाशिवाय सेवा नाही

Pune: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळाचे सक्तीचे निर्णय

Post View : 29

Author

स्वारगेट बसस्थानकातील धक्कादायक घटनेनंतर एसटी महामंडळ मोठ्या संकटात सापडले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेवर उठलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर निर्णय घेत गणवेश सक्तीचा आदेश जारी केला आहे.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक केली आहे. मात्र, या प्रकारामुळे एसटी महामंडळावर तीव्र टीका होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, एसटी प्रशासनही निशाण्यावर आले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या प्रतिमेचे संरक्षण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने राज्यभरातील सर्व चालक आणि वाहकांसाठी गणवेश सक्तीचा आदेश जारी केला आहे.

Akola MSEDCL : अकोल्यातील महावितरण पोरका

गणवेशाबद्दल सक्ती

एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक चालक आणि वाहकाने ठराविक गणवेश घालणे बंधनकारक असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. महामंडळाने असेही नमूद केले आहे की, सद्यस्थितीत अनेक कर्मचारी खाकी गणवेश न घालता वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये दिसून येत आहेत. यामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत असून, प्रवाशांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार, मार्ग तपासणी पथक, सुरक्षा विभाग आणि आगार भेटीदरम्यान गणवेशाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. जे कर्मचारी नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.

खाकी टी-शर्टलाही बंदी

स्वारगेट बसस्थानकातील धक्कादायक प्रकारानंतर महामंडळाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. चालक आणि वाहकांना गणवेशाऐवजी खाकी रंगाचे लोगो असलेले टी-शर्ट परिधान करण्यावरही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. महामंडळाच्या आदेशानुसार, चालक-वाहकांना फक्त अधिकृत गणवेशच घालावा लागणार आहे.

एसटी कामगार संघटना या निर्णयामुळे नाराज झाल्या आहेत. महामंडळाने गणवेशाचा कापड दिले, पण शिलाईसाठी कोणतीही सुविधा दिली नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.त्यामुळे चालक-वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने अशा अचानक घेतलेल्या निर्णयांमुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

निर्णयामागे खास हेतू 

एसटी महामंडळाच्या मते, ठराविक गणवेश परिधान केल्याने महामंडळाची प्रतिमा सुधारेल आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटेल. महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे कठोर पाऊल उचलले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचार केला जात आहे. स्वारगेट बसस्थानकातील धक्कादायक प्रकारानंतर एसटी महामंडळाने घेतलेला हा निर्णय योग्य की जाचक, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र, या निर्णयामुळे चालक-वाहकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, या विषयावर लवकरच मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!