
खत वितरणात जबरदस्तीने इतर वस्तू विक्रीचा खेळ सुरू असून, शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. या अन्यायाविरोधात आमदार सुधीर मुनगंटीवार थेट पोलिसांत तक्रार दाखल करून कायदेशीर लढ्याचा बिगुल वाजवणार आहेत.
राजकारणात सत्तेच्या खुर्चीवर विराजमान असतानाही, शेतकऱ्यांचे प्रश्न डोळ्यांत ठेवून लढणारे नेते म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संघर्षाचा झेंडा हाती घेतला आहे. रासायनिक खतांच्या वितरणात सुरू असलेल्या बेकायदेशीर लिंकिंगप्रकरणी त्यांनी थेट पोलिसांत धाव घेत, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या नामांकित कंपनीविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
बल्लारपूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईतून शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा मुनगंटीवार यांचा निर्धार दिसतो आहे. खत देताना इतर अनावश्यक वस्तूंची विक्री बळजबरीने लादली जात असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून येत होत्या. परिणामी, खत घ्यायचं तर साबण, बिया, कीटकनाशकं घ्या, या अटीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पिळले जात होते.

अन्याय खपवणार नाही
मुनगंटीवार यांनी या अनिष्ट प्रवृत्तीविरोधात फक्त आवाजच उठवला नाही, तर कायदेशीर पातळीवर थेट कृती करत, शेतकऱ्यांसाठी पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान आणि संरक्षण यासाठी कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा देत त्यांनी यामागे उभा असलेल्या साखळीचा छडा लावण्याचा इशाराही दिला आहे.
हे प्रकरण केवळ स्थानिक पातळीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर खत वितरणव्यवस्थेतील नियमन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरलं आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडसारख्या मोठ्या कंपनीने वितरकांवर अनावश्यक दबाव टाकून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा आरोप केवळ गंभीरच नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाशीही खेळ करणारा आहे.
जबाबदारीची जाणीव
या तक्रारीच्या माध्यमातून केवळ एका कंपनीला चपराक बसणार नाही, तर एक उदाहरणही उभं राहील. मुनगंटीवार यांची ही पावले म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट नाही. शेतकऱ्यांच्या सोसलेल्या वेदनांचा आवाज बनवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडल्याचं चित्र निर्माण होत आहे. राज्याच्या कृषी धोरणात जबाबदार जागा असलेल्या नेत्याने अशी थेट कृती केल्यामुळे, शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.
मुनगंटीवार यांच्या या भूमिकेमुळे इतर राजकारण्यांनाही शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल, अशी चर्चा ग्रामस्तरावर रंगू लागली आहे. शासनात असूनही अन्यायाविरुद्ध थेट मैदानात उतरण्याची ही भूमिका मुनगंटीवार यांना सर्वांपेक्षा वेगळी जबाबदारीची जाणीव असलेली नेतृत्वशैली बनवते.