महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : ठाकरे ब्रँड आता खपत नाही, शिव्यांशिवाय आवाजही निघत नाही 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे घरगुती गप्पा; मुनगंटीवार यांचा टोला 

Post View : 27

Author

उद्धव ठाकरे यांनी दिलेली मुलाखत ही फक्त स्वतःचं कौतुक आणि विरोधकांवर टीकेचा डाव असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते म्हणाले, ही मुलाखत म्हणजे लोकशाहीचा संवाद नसून, घरघुती स्क्रिप्ट आणि आत्मप्रशस्तीचा नाट्यप्रयोग आहे.

लोकशाहीचं व्यासपीठ की कौतुकाचं स्टुडिओ सेट? असा घणाघात करत भाजपचे नेते माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची ‘सामना’मध्ये दिलेली मुलाखत भलत्याच शब्दांत धुवून काढली. ही मुलाखत म्हणजे संवाद नाही, तो एक घरघुती नाट्यप्रयोग आहे. जिथं प्रश्न आधीच आखले गेलेले असतात, उत्तरं ठरवलेली असतात आणि उद्देश एकच, स्वतःचं ‘ब्रँड बिल्डिंग’.

उद्धव ठाकरेंच्या या ‘घोषित कौतुक-मंचा’ला मुनगंटीवारांनी चांगलंच वाभाडं काढलं. मुलाखत म्हणजे विचारांची देवाणघेवाण, नव्या संकल्पनांचा झरा, पण इथे काय? शिव्या, आरोप, आणि स्वतःचं पॅकेजिंग, हेच जर धोरण असेल, तर ठाकरे ब्रँड आता ना बाजारात विकला जातोय ना मतदारांच्या मनात टिकतोय, असा टोकदार टोला त्यांनी लगावला.

लोकशाही की नाटक?

मुनगंटीवार यांनी ‘सामना’मधील ठाकरे-राऊत संवादावर कडवट टीका करत स्पष्ट सांगितलं की, ही ‘मुलाखत’ नसून एक घरगुती स्क्रिप्ट आहे. त्यात ना महाराष्ट्राचं भविष्य, ना कोणती वैचारिक दिशा. केवळ शिव्या आणि आपली स्वतःची पालखी उचलून मिरवणं. मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधत म्हटलं, संजय राऊतांनी या पूर्वीही अशाच पद्धतीची मुलाखत घेतली आणि थेट पंतप्रधान पदापर्यंत नेऊन ठेवलं. पण हे जनतेला हवे आहे का? नव्या ज्ञानाचा पाऊस पडतोय का तिथं? नाही.

मुनगंटीवार म्हणाले, “ठाकरे ब्रँडचं मार्केटच आता कोसळलेलं आहे. ना मतदार भावतोय, ना ग्राहक. फक्त जुनी ‘हयगय’ गाणी लावून लोकांवर थोपवली जात आहेत. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर ठाकरे यांनी खरोखरच महाराष्ट्राच्या विकासावर, आर्थिक धोरणांवर, तरुणांच्या भविष्यावर बोललं असतं, तर भाजपनेही ही मुलाखत कान देऊन ऐकली असती. पण “फक्त ‘मी… माझं… माझ्यासाठी’ या एकपक्षीय भाषणाला ‘मुलाखत’ म्हणणं म्हणजे लोकशाहीची थट्टा, असंही ते म्हणाले.

Parinay Fuke : दादांनी शिवधनुष्य पुन्हा पेललं अन् विरोधकांना नमवून ठेवलं 

बोचरी टीका 

या मुद्द्यावरून मुनगंटीवार यांनी आणखी एक विस्फोटक विधान केलं. ठाकरे यांनी जर प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी मागणी केली असती, तर आजचा राजकीय नकाशा वेगळा असता. बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ शकतात, मग ठाकरे का नाही? पण आज ठाकरे गट केवळ टीका करण्यापुरता मर्यादित राहिला आहे, गुजरात, केंद्र सरकार आणि मोदी-शहा यांच्यावर कुरघोडी करणं हेच जणू त्यांचं काम आहे, असा घणाघात त्यांनी केला.

मुनगंटीवार यांचा सर्वात तीव्र आरोप म्हणजे, शिव्या देणं, द्वेष पेरणं आणि विरोधकांना खलनायक ठरवणं म्हणजे काही विचारमूल्य नाही. हे निव्वळ पोकळ घोषणांचं युग आहे. अशा मुलाखती ऐकून काही मिळत नाही. उलट ते पाहणं म्हणजे वेळेचा अपव्यय. सुधीर मुनगंटीवारांनी या मुलाखतीला डायलॉगबाजीची रिहर्सल असं संबोधून भाजपच्या पातळीवरून एक नवा राजकीय सुर उचलला आहे. हे वक्तव्य राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवणारं ठरलं आहे. शिवसेना (ठाकरे गट) कडून यावर काय प्रत्युत्तर येतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!