अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीची उत्सुकता वाढली असून पक्षीय हालचालींना वेग आला आहे. भाजप, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील मुकाबला या निवडणुकीत रंगणार आहे.
अकोल्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीच्या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी विदर्भातील राजकीय वातावरणाला वेगळेच उधाण आले आहे. नगरसेवक होण्याच्या इच्छेने पेटलेल्या विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आता आपापल्या पक्षाच्या हितासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गटस्तरावरून प्रभाग पातळीपर्यंत संपर्क वाढविण्याचे प्रयत्न, सोशल मीडिया ते प्रत्यक्ष प्रचाराच्या हालचाली, प्रत्येक ठिकाणी उत्साह ओसंडून वाहताना दिसतो.
अलीकडच्या काळात अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती, पण पश्चिम अकोल्यातील झालेला पराभव हा राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणणारा ठरला आहे. या पराभवामुळे भाजपची ताकद काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्याचबरोबर शहरातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. या पार्श्वभूमीवर येणारी निवडणूक भाजपसाठी सोपी राहणार नाही, हे राजकीय जाणकारांना उमजते आहे.
गटबाजीचे आव्हान
यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट ही भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्तरावर आपली ताकद दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रभाव फारसा नसला तरी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या समन्वयामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेसमोर एक भक्कम आघाडी उभी राहील. ही ताकद नगरसेवक पदांसाठीच्या लढतीत महत्त्वाची ठरणार आहे.
भाजपमध्ये सध्या अंतर्गत मतभेद आणि गटबाजी तीव्र झालेले दिसतात. काही स्थानिक नेते आपले गटभान जपत आहेत, तर काही कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतो. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत देखील याच प्रकारची अस्वस्थता दिसून येते. दुसरीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यामध्ये फारसे वर्चस्व नाही. मोठे नेते सार्वजनिक संपर्कात नसल्यामुळे त्यांचा प्रभाव मर्यादितच राहील. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट अशी थेट लढत रंगण्याची शक्यता आहे.
Corporation Election : देवाभाऊंच्या मतदारसंघात पुन्हा झिंगझिंग झिंगाट
निवडणुकीच्या रणांगणाची तयारी
अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. पक्षांचा अंतर्गत कलह, स्थानिक पातळीवरील गणिते, सोशल मीडिया मोहिम आणि कार्यकर्त्यांची ताकद यांचा एकत्रित परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. या सर्व घडामोडींमुळे अकोल्यातील निवडणूक केवळ सत्तेसाठीची लढत नसून पक्षांच्या संघटनशक्तीची खरी परीक्षा ठरणार आहे.
