अख्ख्या देशात डंका गाजविणारे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील राजकीय चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांचं गृहशहर असलेल्या नागपुरात वाहतूक व्यवस्थेचा वाजलेला बोजवारा अद्यापही कायम आहे. उलट बिकट होत आहे.
केंद्र सरकारमधील एक हेवीवेट मंत्री, दिल्लीपर्यंत वजन असलेले मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फडणवीसांनीही ज्यांना सीएम म्हणून संबोधित केले, ते आमदार डॉ. परिणय फुके, फडणवीसांचे माजी मानद सचिव आणि विद्यमान आमदार संदीप जोशी यांच्यासह अनेक वजनदार नावं घेता येतील अशा नेत्यांचं गृहशहर नागपूर. परंतु या नागपुरात वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा वाजला आहे. हा बोजवारा आता आणखी किचकट होत चालला आहे.
झेड प्लसपेक्षाही खास सुरक्षा असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपूरचेच. भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचंही गाव नागपूर. माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहितही याच गावात लहानाचे मोठे झाले. मुख्यमंत्र्यांच्या अगदी आसपास दिसणाऱ्या नेत्यांपैकी आमदार प्रवीण दटके, मोहन मते हे देखील याच गावातील. आमदार विजय वडेट्टीवार, आमदार नाना पटोले, आमदार अभिजित वंजारी, आमदार विकास ठाकरे यांच्यासारखे आक्रमक विरोधी आमदार असतानाही नागपुरात वाहतूक अव्यवस्थेचा महापूर कायम आहे.
Indian Politics : निवडणूक यादीतील निष्क्रिय पक्षांवर आयोगाचा थेट दणका
केवळ देखावा नको
नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा प्रकार काही नवीन नाही. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तर या बाबतीत उघड नाराजी व्यक्त केली होती. चिन्मय पंडीत वाहतूक शाखेचे उपायुक्त असताना काहीसे बदल शहरात दिसले. त्यानंतर अर्चित चांडक वाहतूक उपायुक्त होईपर्यंत हा विभाग सुस्त अजगरासारखा पडला होता. त्यांना केवळ चलान आणि लक्ष्मी उपासना तेवढीच माहिती होती. आता या तर या विभागाची केवळ चमकोगिरी सुरू आहे. नाकाबंदीत सामान्य दुचाकी चालकांना त्रास द्यायचा, कुटुंबासह प्रवास करणाऱ्या कार चालकांशी उद्धट वागायचे आणि पोलिसी खाक्या दाखवायचा असा प्रकारच सुरू झाला आहे. या सगळ्या चमकोगिरीत मात्र वाहतुकीची वास्तविक समस्या अद्यापही दुर्लक्षित आहे.
आजही प्रचंड गर्दीत सायरन वाजवत अॅम्ब्युलन्स अडकून पडत आहेत. यु-टर्न मोहिम राबविणारे वाहतूक पोलिस चौकातून गायब राहात असल्याचे तेथील लेफ्ट टर्न अद्यापही बंद आहेत. सीताबर्डी, मानेवाडा, शताब्दी चौक, सदर, मेडिकल चौक, सीताबर्डी ते विमानतळख् खामला, धरमपेठ, तुकडोजी पुतळा चौक, रेशीमबाग, शंकर नगर, रेल्वे स्टेशन या मार्गावर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक अनेक तासांपर्यंत खोळंबत आहे. फोन केल्यानंतरही वाहतूक पोलिस येत नाहीत. 112 क्रमांकावर फोन लावल्यानंतर मदतीसाठी संबंधित पोलिस स्टेशनला कळविण्यात येते. संबंधित पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा फोन येतो. परंतु हे ‘ट्रॅफिक’ विभागाचे काम असल्याचं सांगत तक्रार निकाली काढण्यात येते. वाहन चालक मात्र जाम मध्ये अडकून पडलेले राहतात. इतकेच काय तर प्रसंगी लोकांना खाली उतरून सायरन वाजविणाऱ्या अॅम्ब्युलन्सला मार्ग काढुन द्यावा लागतो.
असाच प्रकार झिरो माइल चौकाजवळ घडला. ट्रॅफिक जाम मुळे एक अॅम्ब्युलन्स सायरन वाजवत जाम मध्ये अडकून पडली होती. चौकात वाहतूक पोलिस होते. परंतु ते चलान करण्यात व्यस्त होते. अखेर अॅम्ब्युलन्स मधील एक तरूण आणि मुलगी खाली उतरली. त्यांनी स्वत:च आपला मार्ग मोकळा करून घेतला. असाच प्रकार रहाटे कॉलनी मार्गावरील जेलजवळ असलेल्या सिग्नलवरही घडला. वर्धा मार्गावर तर अशा अडकून पडणाऱ्या अॅब्म्युलन्सची संख्या बरीच आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यापूर्वीच एका जनहित याचिकेवर निकाल देताना हा मुद्दा स्पष्ट केला आहे. वाहतूक पोलिसांची पहिली जबाबदारी ही वाहतूक सुरळीत ठेवण्याची आहे. कोर्टाने हे ठणकावून सांगितले आहे. मात्र आता सोशल मीडियावर नागपूरकर वाहतूक शाखेच्या चमकोगिरीची पोलखोल करीत आहेत. नागपुरात ठिकठिकाणी खोळंबलेल्या वाहतुकीचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. वाहतूक शाखेने ट्रॅफिक मित्र म्हणून लोकांकडून सूचना मागविल्या होत्या. शहरातील अनेकांनी लेखी स्वरूपात चांगल्या सूचना वाहतूक शाखेला दिल्या. पण त्याची काहीच अंमलबजावणी झाली नाही.
Parinay Fuke : आमदाराच्या सहवासात नवनिर्वाचितांना मिळाला अभिमानाचा आदर
दुचाकी, चारचाकीवरील नंबर प्लेटवरील नंबर खोडून अनेक वाहने शहरातून फिरत आहेत. त्याची माहितीही वाहतूक शाखेला देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यात किती वाजता अशी वाहने कुठे दिसतील ही नेमकी वेळ देखील सांगण्यात आली. परंतु सध्या केवळ प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी या सर्व माहितीकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. त्यामुळे आधीची परिस्थिती बरी होती, हे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रचंड नाकाबंदी असताना विना नंबर प्लेटची वाहने सुटतातच कशी असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. यावरून नाकाबंदीचा केवळ दिखावा सुरू आहे का? असा संताप व्यक्त होत आहे.
केवळ चलानमध्ये धन्यता
आतापर्यंत नागपुरातून दुचाकीवर तीन जण प्रवार करताना आपण पाहिले असतील. परंतु आता दुचाकीवरून चार ते पाच जण प्रवास करताना दिसू लागले आहेत. त्याचे पुरावेही नागरिकांनी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. परंतु आमच्या मागे नाकाबंदीचे चेंगट आहे. व्हीव्हीआयपी मुव्हमेंटचा बंदोबस्त आहे, अशी कारणे दिली जात आहेत. वाहतूक पोलिसांच्या मदतीला त्या त्या विभागातील बीट मार्शल, पोलिस स्टेशनच्या पेट्रोलिंग वाहनांनी देखील अनाऊन्समेंट करावी, अशी सूचनाही नागरिकांनी केली होती. मात्र पोलिस सध्या केवळ ‘ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह’ या एकाच मोहिमेच्या नादी लागले आहेत.
Sameer Shinde : शोषितांच्या हक्कासाठी झटणाऱ्या शहर प्रमुखांना समितीवर स्थान
नागपूर पोलिसांनी कितीही गाजावाजा केला तरी अंमली पदार्थ अर्थात एमडी आताही विकली जात आहे. त्याचे पाहिजे तेवढे पुरावे देता येतील. फरक इतकाच आहे की, आधीपेक्षा अंमली पदार्थाचे दर वाढले आहे. पोलिस कारवाई करीत आहे. त्यामुळे ‘स्टफ सप्लायर्स’नी ‘रेट’ वाढविले आहे. नाकाबंदीत अनेक ठिकाणी वाइन शॉपच्या जवळपास निघणाऱ्या दुचाकी चालकांनी पकडले जाते. असे दुचाकी चालक आधीच मद्यप्राशन करून असतात. त्यामुळे त्यांच्याकडून पाहिजे ते मिळाले की वाहतूक पोलिस अशांना वाट मोकळी करून देत आहेत.
पूर्वी सांगितल्या प्रमाणे चिन्मय पंडीत यांच्यानंतर अर्चित चांडक यांच्यापर्यंत नागपुरातील वाहतूक व्यवस्था प्रचंड ‘होपलेस’ अशीच होती. न भुतो न भविष्यती अशी ‘होपलेस’ व्यवस्था सारंग आवाड यांच्या कार्यकाळात अनुभवायला मिळाली. स्वत: अमितेश कुमार यांना त्यावेळी रस्त्यावर उतरून काम करावे लागले होते. आपल्या मनाप्रमाणे वाहतूक व्यवस्थेचे काम झाले काम झाले नाही, अशी कबुली अमितेश कुमार यांनीही दिली होती. अजनी रेल्वे पुलावर जे कठडे उभारण्यात आले आहेत, ते आवाड आणि अमितेश कुमार यांच्याच कार्यकाळातील आहेत. त्यांच्यानंतर खऱ्या अर्थाने कुणी नागपुरातील वाहतूक व्यवस्था सुधरविण्याचे काम केले ते उपायुक्त अर्चित चांडक यांनी.
कोणतीही चमकोगिरी, प्रसिद्धीच्या मागे न लागता चांडक यांनी ‘ग्राऊंड लेव्हल’वर काम केले. आता वाहतूक शाखेची जबाबदारी लोहित मतानी यांच्याकडे आली आहे. मतानी यांनी स्वत: एसी केबीनमध्ये बसून खुर्ची तोडण्यापेक्षा ‘फिल्ड’वर उतरून काम करणे सुरू केले आहे. खरोखर ही आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. पण लोकांकडून येणारे ‘इनपुट’ त्यांनी स्वत: व त्यांच्या अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेणे नितांत गरजेचे आहे. असं झालं नाही तर एकट्या मतानी यांनी कितीही काम केलं तरी नागपुरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था वळणावर येणार नाही. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नागपूरकरांना चांगली आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याबद्दल जनतेची माफी मागावी लागण्याची वेळ येईल, तो दिवस दूर नाही.