दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील भविष्यासंदर्भात नव्या चर्चा. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले संकेत.
दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या मोठ्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत राहण्याबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, ठाकरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून भविष्यातील दिशा ठरवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दिल्लीतील निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आप आणि काँग्रेसने स्वतंत्र लढल्यामुळे हा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते राहुल गांधींना टोला लगावत, “अजून भांडत बसा!” असा उपरोधिक सल्ला दिला.
एकत्र असते तर निकाल असता वेगळा
संजय राऊत यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले की, “दिल्लीतील पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे इंडिया आघाडीतील दोन पक्षांनी वेगवेगळ्या वाटा स्वीकारल्या. जर आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आले असते, तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता.”
ठाकरे यांनी राहुल गांधींसोबत चर्चा करताना “महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबवला गेला असता, तर हा निकाल वेगळा लागला असता,” असेही सुचवले. यावर राऊत म्हणाले की, “लातूर पॅटर्नसारखे प्रयोग अल्पकाळ यशस्वी होतात, पण दीर्घकालीन राजकारणासाठी वेगळ्या रणनीतीची गरज असते.”
भविष्यातील भूमिकेवर उत्सुकता
दिल्लीतील निकालांबाबत ठाकरे यांनी चिंता व्यक्त करत नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. “सर्वांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवावी लागेल,” असे त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहणार का, की नवीन रणनीती आखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर भाजप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत भविष्यातील वाटचालीबद्दल यंदा व्यक्त केली आहे. सोबतच महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयामुळे उद्धव ठाकरे महायुतीसोबत हात मिळवणी करतील का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तर दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत.
