
महाकुंभ म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि आध्यात्मिक उर्जेचा महासंगम. 144 वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा संपन्न झाला. तर अनेक भक्तांना महा कुंभमेळ्यात स्नानाचा लाभ घेता आला नाही. यासाठी माजी खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला.
महाकुंभ केवळ एक धार्मिक उत्सव नाही. तो भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक क्षण असतो. अवकाशातील नवग्रहांच्या स्थितीनुसार दर 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. प्रत्येक 144 वर्षांनी महाकुंभचा योग जुळून येतो. या महापर्वात भारतासह संपूर्ण जगभरातील कोट्यवधी भाविक एकत्र येऊन पुण्यस्नान करतात.
यंदा मकरसंक्रांत ते महाशिवरात्री या कालावधीत प्रयागराज येथे भव्य महाकुंभ मेळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली या पर्वासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली. जगभरातून 65 कोटींहून अधिक श्रद्धाळूंनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात पुण्यस्नान करून आध्यात्मिक लाभ घेतला. परंतु काही भाविक या महाकुंभमेळ्यात जाऊ शकले नाहीत. त्यांच्यासाठी भंडाऱ्याचे माजी खासदार सुनील मेंढे भगीरथ बनले. प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील पाण्यानं त्यांनी भंडारा-गोंदियातील भाविकांसाठी पवित्र स्नानाची व्यवस्था केली.

Mahayuti Politics : शिंदेंच्या नेतृत्वाखालील कारभारावर मुख्यमंत्री असमाधानी
टँकरने पाणी
महाशिवरात्री हा महाकुंभ पर्वाचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी ज्या श्रद्धाळूंना प्रयागराज येथे जाता आले नाही, त्यांच्यासाठी भंडाऱ्यात एक अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली. माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने व सकल हिंदू समाजाच्या आयोजनाने प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील पवित्र जल टँकरच्या सहाय्याने भंडाऱ्यात आणण्यात आले. हे पवित्र जल बहिरंगेश्वर मंदिराच्या खाम तलाव परिसरात आणले गेले. त्यानंतर महाकुंभ स्नान सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यात सात हजारांहून अधिक भाविकांनी पुण्यस्नानाचा लाभ घेतला आणि आध्यात्मिक समाधान मिळवले. त्यामुळं या भाविकांसाठी सुनील मेंढे हे गंगा आणणारे भगीरथ ठरले आहेत.
भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
पवित्र सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांनी माजी खासदार सुनील मेंढे यांचे आभार मानले. प्रयागराज येथे जाणे शक्य नसलेल्या असंख्य भाविकांनाआपल्याच गावात महाकुंभ स्नानाचा लाभ घेता आला. यामुळे भंडाऱ्यातील नागरिक आनंदित झाले आहेत. महाकुंभ स्नान केवळ धार्मिक विधी नाही. महाकुंभ स्नान मनःशांती, भक्ती आणि संस्कृतीच्या मिलाफाचा अनमोल क्षण असतो. भंडाऱ्यात झालेल्या या सोहळ्याने हजारो लोकांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव दिला. विशेष म्हणजे यासाठी माजी खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला. माजी खासदार मेंढे हे स्वत: रामभक्त आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहे. त्यामुळं महाकुंभ सारख्या पर्वाचे महत्व ते जाणतात. त्यामुळंच आपल्या भागातील नागरिकांनाही महाकुंभ स्नानाचा लाभ मिळावा, या हेतूनं त्यांनी हे आयोजन केलं. महाशिवरात्रीच्या दिवशी भंडाऱ्यात पार पडलेल्या महाकुंभ स्नानाने इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा अध्याय लिहिला गेला आहे.